Karishma Tanna Baby Boy: प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांच्या आयुष्यात नवी सुरुवात झाली आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर, २९ जुलै २०२६ रोजी करिश्माने एका गोंडस मुलाला जन्म दिला. या आनंदाच्या बातमीमुळे त्यांच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण असून चाहते आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
करिश्मा आणि वरुण यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या प्रेग्नेंसीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तेव्हापासून तिच्या प्रेग्नन्सीशी संबंधित प्रत्येक अपडेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत होता. आता अखेर या कपलच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.
मुलाच्या जन्मानंतर करिश्मा आणि वरुण यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, "गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद मिळाला आहे. २९ जुलै २०२६ रोजी आमच्या छोट्या जगात तुझे स्वागत आहे." या पोस्टनंतर चाहत्यांसह टीव्ही आणि बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
करिश्मा तन्ना ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आहे. 'क्यूंकी सास भी कभी बहू थी', 'नागिन ३' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून तिने अभिनयाची वेगळी छाप पाडली. याशिवाय तिने अनेक रिअॅलिटी शोमध्येही काम केले आहे. 'बिग बॉस ८' आणि 'खतरों के खिलाडी १०' मधील तिच्या सहभागामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
केवळ टेलिव्हिजनच नव्हे तर बॉलीवूडमध्येही करिश्माने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'संजू' आणि 'सूरज पे मंगल भारी' यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच हंसल मेहता यांच्या स्कूप या वेब सिरिजमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या असून तिच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे. करिश्मा आणि बिझनेसमॅन वरुण बंगेरा यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये अतिशय साध्या आणि खाजगी पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर या दोघांनी आपले वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीच्या झोतात न ठेवता खासगी ठेवण्यालाच प्राधान्य दिले.