Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि ‘काला हिरण : द बॅटल फॉर लेगेसी’ या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांमधील वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिल्ली हायकोर्टाने 27 जुलै रोजी सलमान खानच्या व्यक्तिमत्त्व अधिकारांशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना चित्रपटाचा टीझर आणि त्याच्याशी संबंधित प्रमोशनल व्हिडिओ इंटरनेटवरून हटवण्याचे निर्देश दिले होते.
अमित जानी यांनी हायकोर्टाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाच्या आदेशाचा त्यांनी सन्मान करत टीझर आणि संबंधित मुलाखती हटवल्या. मात्र हा आदेश न्यायपूर्ण नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेत टीझर आणि हटवण्यात आलेल्या मुलाखती पुन्हा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
या वादाची सुरुवात ‘काला हिरण’च्या टीझर आणि पोस्टरनंतर झाली. हा चित्रपट 1998 मधील चर्चित काळवीट शिकार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात सलमान खानचे नाव समोर आले होते. चित्रपटाच्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये सलमान खानशी साम्य असलेल्या व्यक्तिरेखेचा वापर करण्यात आल्याचा आक्षेप अभिनेत्याने घेतला. विशेषतः चित्रपटातील प्रमुख पात्राच्या हातातील ब्रेसलेट हे सलमानच्या प्रसिद्ध ब्रेसलेटसारखे असल्याचे त्यांच्या याचिकेत नमूद करण्यात आले होते.
सलमान खानने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करत आपल्या ‘पर्सनॅलिटी राइट्स’चे संरक्षण करण्याची मागणी केली होती. चित्रपटाच्या माध्यमातून आपली प्रतिमा आणि व्यक्तिमत्त्वाचा परवानगीशिवाय वापर होत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने टीझरच्या विविध ऑनलाइन लिंक्स हटवण्याचे तसेच निर्माते अमित जानी यांच्या काही मुलाखती काढून टाकण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटाचा सलमान खानशी थेट संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच हा चित्रपट अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या चौकटीत येतो, असा त्यांचा युक्तिवाद आहे. आता अमित जानी यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात काय निर्णय होतो, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.