Model Extortion Case: मुंबई आणि ठाणे परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर १० लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या एका प्रसिद्ध मॉडेलविरोधात १ कोटी ३९ लाख रुपयांच्या खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप या मॉडेलवर करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
१.३९ कोटी रुपये उकळल्याचा आरोप
व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित मॉडेलने त्याला हनीट्रॅपमध्ये अडकवले. त्यानंतर बदनामी करण्याची आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून वेळोवेळी पैसे घेतल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकारात तब्बल १ कोटी ३९ लाख रुपयांची रक्कम उकळण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
आलिशान फ्लॅटपासून परदेश दौऱ्यांपर्यंत खर्च
या प्रकरणातील एफआयआरमध्ये अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. संबंधित मॉडेलसाठी व्यावसायिकाकडून आलिशान फ्लॅट, एमजी हेक्टर कार आणि बंगळुरूमधील मालमत्तेसाठी खर्च करवून घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय ऑफिससाठी जागा आणि विविध महागड्या गरजांसाठीही पैसे घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इतकेच नव्हे तर बँकॉक, व्हिएतनाम, जॉर्जिया आणि बाकू यांसारख्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी खर्चही व्यावसायिकाकडून करवून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
व्यावसायिकाविरोधातही गंभीर गुन्हे दाखल
या प्रकरणाला आणखी एक वेगळे वळण मिळाले आहे. संबंधित मॉडेलने व्यावसायिकाविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात पाठलाग, मारहाण आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, हे गुन्हे आपल्यावर दबाव आणण्यासाठी दाखल करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराच्या वकिलांनी केला आहे.
कापूरबावडी पोलिसांकडून तपास सुरू
दरम्यान, संबंधित मॉडेलचे सोशल मीडियावर १० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या प्रकरणामुळे मनोरंजन आणि सोशल मीडिया क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.