Famous Actor Death: हॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'स्टार ट्रेक' आणि 'एक्स-मेन' यांसारख्या लोकप्रिय चित्रपट सिरिजमधून जगभरात ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते पॅट्रिक स्टुअर्ट यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. लॉस एंजेलिसमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अल्झायमर आणि लेवी बॉडी डिमेंशिया यांसारख्या आजारांशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे हॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
कुटुंबीयांकडून निधनाची माहिती
पॅट्रिक स्टुअर्ट यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक निवेदन पोस्ट केले आहे. या निवेदनातून त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. त्यांच्या पत्नी सनी या आजारपणात त्यांची काळजी घेत होत्या. त्यांच्या पश्चात पत्नी सनी आणि डॅनियल व सोफी ही दोन मुले असा परिवार आहे.
ह्यु जॅकमनने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
'एक्स-मेन' चित्रपट सिरिजमध्ये पॅट्रिक स्टुअर्ट यांनी प्रोफेसर एक्स ही भूमिका साकारली होती. या चित्रपटात वॉल्व्हरिनची भूमिका साकारणारा अभिनेता ह्यु जॅकमन याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सोशल मीडियावर काही जुने फोटो शेअर करत त्याने पॅट्रिक लिहिले, 'आज आपण रंगभूमी आणि पडद्यावरील एका महान व्यक्तिमत्त्वाला गमावले आहे. माझ्या दृष्टीने, तो एक उत्तम मित्र आणि एक महान व्यक्ती होता. मी त्याच्याकडून खूप काही शिकलो. पॅट्रिक स्टुअर्ट, तुमची उणीव मला सदैव जाणवत राहील.'
मार्व्हल स्टुडिओकडूनही श्रद्धांजली
मार्व्हल स्टुडिओनेही पॅट्रिक स्टुअर्ट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. प्रोफेसर चार्ल्स झेवियर या भूमिकेला त्यांनी वेगळी ओळख मिळवून दिली. 'एक्स-मेन', 'लोगन' यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.
रंगभूमीपासून हॉलिवूडपर्यंत
१३ जुलै १९४० रोजी इंग्लंडमधील मिर्फिल्ड येथे पॅट्रिक स्टुअर्ट यांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली. रॉयल शेक्सपिअर कंपनीसोबतही त्यांनी काम केले. 'स्टार ट्रेक: द नेक्स्ट जनरेशन' या मालिकेतील कॅप्टन जीन-ल्यूक पिकार्ड या भूमिकेमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.