Dharmaveer 2 : CM एकनाथ शिंदे 'धर्मवीर २' चित्रपटात झळकणार? चर्चांना उधाण

Eknath Shinde Will Debut In Marathi Movie: सध्या सोशल मीडियावर 'धर्मवीर २' चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात प्रसाद ओकने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात आता एकनाथ शिंदे दिसणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहेत.
Dharmaveer 2
Dharmaveer 2Saam Tv
Published On

श्वेता भालेकर परब, साम टीव्ही, वृत्तनिवेदक

'धर्मवीर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत, अशा चर्चा रंगल्या आहेत. चर्चा नेमकी कुठून सुरु झाली ? तर मुंबईतल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नुकतंच 'धर्मवीर 2' चं पोस्टर प्रदर्शित झालं. या सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित होते.

बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर याची खास उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सिनेमाचं, प्रसाद ओकचं कौतुक केलं.

या सिनेमाला एकनाथ शिंदेंचं मोलाचं सहकार्य लाभलं म्हणून सर्वांनी त्यांचं, मुख्यमंत्री म्हणून ते बजावत असलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. हे बोलणं सुरू असताना सचिन पिळगावकर यांनी काही संकेत दिले आणि चर्चेला फोडणी मिळाली. चित्रपटात तुम्ही काम केलं नाही, त्याबद्दल आम्हाला अजिबात खंत नाही, असं सचिन पिळगावकर म्हणाले तेव्हा बाजूने 'चित्रपटात आहेत' असं कुणीतरी म्हटलं तेव्हा चित्रपटात आहात, मग हे कधी सांगणार? इंडस्ट्री मधला मी सिनियर ऍक्टर म्हणून तुमचं स्वागत करतो, असं म्हणत सचिन पिळगावकर यांनी स्पष्ट संकेत दिले. आता धर्मवीर 2 मध्ये एकनाथ शिंदे हे पाहुणे कलाकार असणार का? की त्यांनी त्यात भूमिका वठवली आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांसोबत त्यांच्या समर्थकांनाही लागली आहे. 'धर्मवीर' च्या पहिल्या भागात क्षितिज दातेनं एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती.

आनंद दिघे यांची भूमिका पडद्यावर साकारण्याचं शिवधनुष्य प्रसाद ओकनं लिलया पेललं. आता 'धर्मवीर 2' मध्येही प्रसाद ओक दिघेंची भूमिका साकारणार आहे. पण 'अरे एकनाथ' अशी हाक मारल्यावर शिंदेंच्या भूमिकेत शिंदे स्वतः दिसणार की क्षितिज शिंदेंच्या भूमिकेत पुन्हा पाहायला मिळणार याची कमालीची उत्सुकता आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा बदल झाला. सत्तांतर झालं आणि शिंदेंच्या नेतृत्वात नवं सरकार आलं त्या मागचे हिरो एकनाथ शिंदेचं ठरले होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक, दिघेंचा वारसा घेऊन इतरांसाठी जगणाऱ्या एकनाथाची म्हणजेच स्वतःचीच भूमिका वठवून ते हिरो ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. " हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही " असं वाक्य पोस्टरवर आहे. त्यामुळे सिनेमात नेमके कोणकोणते प्रसंग असणार, याबद्दलही सर्वांना उत्कंठा आहे. " आताचा एकनाथ शिंदे आणि पूर्वीचा एकनाथ शिंदे लोकांसाठी काय करत होता, हे या सिनेमात दाखवलं आहे, हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे पण सगळंच खरं दाखवू शकत नाही ", असंही शिंदेंनी यावेळी मिश्किलपणे सांगितलं. मी मुख्यमंत्री नाही तर राज्याचा सेवक आहे.

आनंद दिघे माझे गुरु आहेत. पावलोपावली त्यांची आठवण येते. त्यांचे शब्द आजही कानावर पडल्यासारखे वाटतात, अशा भावनाही शिंदेंनी या सोहळ्यात व्यक्त केल्या. दिघेंच्या सिनेमाला सहकार्य करणं, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, असं शिंदे सांगतात. त्यामुळे सिनेमाच्या माध्यमातून का होईना, ऑनस्क्रीन गुरु - खरा शिष्य यांची भेट होते का? हे पाहावं लागेल.

Dharmaveer 2
OTT Released This Week : जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार मनोरंजनाचा धमाका; 'मिर्झापूर ३', 'गरुडन' सह वेगवेगळ्या कलाकृती होणार रिलीज

विशेष म्हणजे 30 जून 2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आणि त्याच मुहूर्तावर 'धर्मवीर 2' चं पोस्टर प्रदर्शित केलं गेलं. मंगेश देसाई सिनेमाचे निर्माते आहेत तर कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शनाची धुरा प्रवीण तरडे वाहत आहेत. इतर कलाकारांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. पण टीम तगडी असणार यात शंका नाही. आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित 'धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा प्रचंड गाजला. 2022 साली सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला. अनेक पुरस्कार मिळाले. उत्तम अभिनयासाठी प्रसाद ओकचंही कौतुक झालं आणि चित्रपटाची ही टीम पुन्हा सज्ज झाली आहे. येत्या 9 ऑगस्टला क्रांती दिनाचं औचित्य साधत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यात जर एकनाथ शिंदेंचा अभिनय पाहायचा असेल तर थोडी वाट पाहावीच लागणार ना..

Dharmaveer 2
Alia Bhatt Fitness Mantra: एका मुलीची आई असूनही अलिया दिसते एकदम तरूण, फिटनेसचं रहस्य काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com