बॉलिवूड इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. सुप्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते धीरजलाल शाह यांचे निधन झाले आहे. धीरजलाल शाह यांचे मुंबईतील एका रुग्णालयामध्ये निधन झाले आहे. धीरजलाल यांचे कोव्हिड १९ मुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. धीरजलाल यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, निर्माते धीरजलाल शाह यांचे भाऊ हसमुख यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी दिली आहे. त्यांचे निधन काल अर्थात ११ मार्चला झाले आहे. हसमुखने दिलेल्या माहितीनुसार, धीरजलाल यांना कोविड झाला होता, त्यामुळे त्यांना फुफ्फुसामध्ये त्रास होत होता. गेल्या २० दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. किडनी आणि हृदयावर त्याचा परिणाम झाल्यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली.
बॉलिवूडमधील प्रख्यात चित्रपट निर्माते म्हणून त्यांच्या नावाची ओळख सर्वश्रृत होती. 'गदर २'चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनीही धीरजलाल शाह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनिल शर्मा म्हणतात, "शाह केवळ उत्तम निर्मातेच नाही तर ते उत्तम व्यक्तीही आहेत. त्यांनी आपल्या कामामुळे कायमच चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. धीरजलाल शाह नेहमीच त्यांच्या चित्रपटातून चाहत्यांच्या मनात जीवंत राहतील. चाहत्यांचा त्यांच्या चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे."
निर्माते हरीश सुगंध यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. "त्या काळामध्ये बनलेल्या चित्रपटांच्या व्हिडीओंचे राईट्स शाह यांच्याकडेच होते. ते व्हिडीओचे प्रॉडक्शनचे किंग झाले होते. कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खामध्ये मी सामील आहे. भावपूर्ण श्रद्धांजली, ओम शांती"
शाह यांच्याबाबत सांगायचे झाल्यास, त्यांनी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. सोबतच अजय देवगणच्या 'विजयपथ' चित्रपटाचीही निर्मिती शाह यांनीच केली होती. धीरजलाल शहा यांनी दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या 'द हिरो- लव स्टोरी ऑफ ए स्पाय'ची निर्मिती करुन प्रेक्षकांना निखळ आनंद दिला होता. अनिल शर्मा यांच्या त्या चित्रपटामध्ये सनी देओल, प्रीति झिंटा आणि प्रियंका चोप्रा यांच्या भूमिका होत्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.