Bawaal Film New Release Date: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘बवाल’ची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत वरूण धवन आणि जान्हवी कपूर असून या चित्रपटाची प्रदर्शनाच्या तारखेत तिसऱ्यांदा बदल झाला आहे. प्रेक्षकांना आता ऑक्टोबर महिन्याची प्रतिक्षा करावी लागणार नसून येत्या जुलै महिन्यातच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘बवाल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आतापर्यंत दोन वेळा बदलण्यात आली होती. यापूर्वी हा चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर तारीख पुढे ढकलण्यात आली. निर्मात्यांनी या चित्रपटाची तारीख ६ ऑक्टोबर २०२३ ठरवली होती. पण आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. जान्हवी कपूर आणि वरूण धवनचा आगामी चित्रपट येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अद्याप तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला चित्रपटाविषयी म्हणतात, “ ‘बवाल’ हा माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे. माझ्या महत्वकांक्षी चित्रपटांपैकी एक हा चित्रपट आहे. माझा आवडता चित्रपट दिग्दर्शक नितेश तिवारी आणि जान्हवी-वरूण यांची जोडी पहिल्यांदाच चित्रपटातून समोर येणार असल्याने माझ्यासाठी हा खास चित्रपट आहे. जुलै महिन्यात ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर त्यांचा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने मला खूपच आनंद होत आहे.”
चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी चित्रपटाविषयी म्हणतात, “तीन भारतीय लोकेशन्स आणि पाच युरोपियन देशांमध्ये चित्रित केलेला ‘बवाल’ एक आकर्षक कथा, नाट्यमय व्हिज्युअल आणि मुख्य कलाकार जान्हवी-वरूणची धमाकेदार केमिस्ट्री यांनी परिपूर्ण आहे. हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. सोबतच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठीही आम्ही खूप उत्सुक आहोत.”
‘बवाल’हा रोमँटिक चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. जुलै महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून अद्याप तारीख जाहीर झालेली नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून वरूण धवन आणि जान्हवी कपूर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.