बिग बॉस फेम अभिनेत्रीवर फसवणुकीचा गंभीर आरोप
NRI तरुणाला लग्नाचं वचन देऊन 9 कोटींना लुटले
शैक्षणिक कर्ज, फ्लॅट आणि कार, सोनं यांसाठी पैसे घेतले.
मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीवर लंडनमध्ये राहत असलेल्या घटस्फोटित सॉफ्टवेअर व्यावसायिकाशी लग्नाचे आमिष दाखवून ९.३५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ही अभिनेत्री टॉलीवूडची असून तिचे नाव आशु रेड्डी असे आहे. तिच्या कुटुंबातील तीन सदस्यांवरही फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. 'सेंट्रल क्राइम स्टेशन' (CCS) पोलिसांनी 'BNS'च्या कलम ३१८ (फसवणूक) अंतर्गत या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
TOI च्या वृत्ता असे म्हटले आहे की, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये पीडित व्यक्ती (धर्मेंद्र ) हैदराबादमधील आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आला असताना, एका कॉमन मित्राच्या माध्यमातून त्याची ओळख अभिनेत्रीशी झाली. आपण अमेरिकेत शिक्षण घेत असल्याचे तिने त्यावेळी सांगितले होते. अवघ्या दोन महिन्यांतच त्या दोघांची मैत्री झाली आणि कालांतराने आपण त्याच्याशी लग्न करू असे त्या महिलेने वचन दिले. तसेच तो घटस्फोटित असल्याचा मुद्दा लग्नामध्ये कोणताही अडथळा ठरणार नाही, असेही सांगितले.
अभिनेत्रीने आपल्या वडिलांनी आपल्याला आर्थिक मदत करणे थांबवले असून, आपल्याला चित्रपटसृष्टीत करिअर करायचे आहे, असे कारण देत त्या व्यक्तीकडे आर्थिक मदतीची मागणी केली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्याने केवळ तिच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठीच आर्थिक मदत केली नाही, तर कालांतराने घर (फ्लॅट), सोने, गाडी इत्यादींच्या खरेदीसह विविध खर्चांसाठीही तिला वेळोवेळी पैसे दिले आहेत. तसेच अभिनेत्रीव्यतिरिक्त तिच्या कुटुंबातील सदस्यांनीही त्याच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदाराने हे सर्व केले कारण त्या अभिनेत्रीने आपल्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते, असे त्याने पोलिसांना सांगितले.
तक्रारदाराने जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय काढला, तेव्हा आरोपी महिलेने वेळ मारून नेण्यासाठी काहीही कारणे द्यायला सुरूवात केली. जेव्हा जुलै २०२० मध्ये जेव्हा त्याने दोन्ही कुटुंबांची भेट घडवून आणण्यासाठी आग्रह धरला, तेव्हा तिने त्याचा लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावला. लग्नाला नकार दिल्यानंतर त्या व्यक्तीने महिलेकडे पैसे परत करण्याची मागणी केली तेव्हा त्या महिलेने त्याला टाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने ७० लाख रुपये परत देण्याचे मान्य केले मात्र तेही तिला आर्थिक परिस्थितीमुळे जमले नाही. त्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा त्या व्यक्तीला रिलेशनशिपमध्ये येण्यास मनवले. तेव्हा कुटुंबाने लग्नाला संपती दिली मात्र जुलै २०२५ मध्ये त्यांनी पुन्हा माघार घेतली. शेवटी पीडित व्यक्तीला असे समजले की, ती आरोपी महिला दुसऱ्या एका नातेसंबंधात होती आणि तिने त्याच्याकडून पैसे उकळण्याचा कट रचला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.