Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: ‘बिग बॉस २०’च्या घरात सध्या मैत्री, प्रेम आणि नात्यांवरून जोरदार वाद सुरू आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये बॉलिवूड अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खान पुन्हा एकदा स्पर्धकांची शाळा घेताना दिसला. या भागात सलमानने विशेषतः स्काउटला टार्गेट करत त्याची चांगलीच कानउघाडणी केली. गर्लफ्रेंड काश्वी हिरानंदानीसमोर लव्ह गिलची बाजू न घेतल्याने सलमानने स्काउटला अनेक प्रश्न विचारले. एवढेच नाही, तर त्याच्या मैत्री आणि प्रामाणिकपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘वीकेंड का वार’च्या मंचावर सलमान खानने दमदार एन्ट्री केली. यावेळी तो म्हणाला, “केवळ एक आठवडा मी नव्हतो, तर बघा किती गोष्टी बदलल्या आहेत! थांबा, मला प्रत्येकाचा चेहरा नीट बघू द्या.” यानंतर त्याने स्काउट, लव्ह गिल आणि काश्वी हिरानंदानी यांच्यातील वादावर चर्चा सुरू केली.
स्काउटला सलमान खानने विचारला जाब
सलमानने स्काउटला थेट प्रश्न विचारला की, काश्वी लव्ह गिलला बोलत असताना तू तिची बाजू का घेतली नाहीस? यावर स्काउटने सांगितले की, त्या क्षणी तो पूर्णपणे गोंधळून गेला होता. त्याला नेमके काय करावे हे समजत नव्हते. काश्वी शोमध्ये येण्याच्या काही मिनिटांपूर्वी त्याच विषयावर चर्चा झाली होती. त्यामुळे ती पुन्हा त्याच मुद्द्यावर बोलण्यासाठी आली असावी, असे त्याला वाटले. मात्र, स्काउटचे हे स्पष्टीकरण सलमानला पटले नाही. त्याने स्काउटला सुनावत म्हटले की, या आठवड्यात त्याने हे सिद्ध केले आहे की तो कोणाशीही प्रामाणिक नाही. स्वतःची गर्लफ्रेंड समोर असताना तो ज्या व्यक्तीला बहीण मानतो, तिच्यासाठीही उभा राहू शकला नाही. तसेच जवळचा मित्र यंग याच्यासाठीही त्याने ठाम भूमिका घेतली नाही. यावरुन कळतं तो कोणासाठीचं लॉयल नाही असं सलमान खान म्हणाला
गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून मैत्री तोडणार का?
सलमानने पुढे स्काउटला समजावले की, काश्वीने लव्हबद्दल केलेली वक्तव्ये चुकीची होती. जर तो स्काउटच्या जागी असता, तर त्याने अशी परिस्थिती निर्माण होऊ दिली नसती. एखादी बहीण किंवा मैत्रीण आपल्या मित्राशी संबंध तोडण्यास सांगत असेल, तर हा स्वतःचा निर्णय असल्याचे तिला स्पष्टपणे सांगायला हवे होते, किंवा तुला तिचं म्हणणं पटलं होत तर तू पूर्णपणे कटऑफ करायला पाहिजे कारण ती पण महत्वाची आहे. असेही सलमान म्हणाला. सलमान पुढे म्हणाला, पण स्काऊटने काय केलं, काश्वीने लव्हशी मैत्री तोडण्यास सांगितल्यानंतर स्काउटने सुरुवातीला तिच्यापासून अंतर ठेवले. मात्र, नंतर त्याला हे अंतर सहन झाले नाही. त्यामुळे त्याने मैत्री कायम ठेवली, पण मसाज करणे थांबवले.
नेमका काय होता काश्वी आणि स्काउटमधील वाद?
मागील ‘वीकेंड का वार’मध्ये स्काउटची गर्लफ्रेंड काश्वी हिरानंदानी बिग बॉसच्या घरात आली होती. यावेळी तिने स्काउट आणि लव्ह गिल यांच्या मैत्रीवर आक्षेप घेतला होता. तिने स्काउटला लव्हसोबतची मैत्री संपवण्यास सांगितले होते. सुरुवातीला स्काउटने लव्हपासून अंतर ठेवले, मात्र काही काळानंतर त्यांच्यात पुन्हा बोलणं सुरू केलं. यामुळे घरातील इतर सदस्यांनीही स्काउटवर टीका केली. आता सलमान खाननेही त्याच्या या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.