https://www.instagram.com/p/DRPMhMKkhQu/?img_index=1Mukta Barve: मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन प्रयोगांची लाट सुरू असताना, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री मुक्ता बर्वे नव्या वर्षाची सुरुवात एका खास भेटीसह करत आहे. नेहमीच आशयघन, दमदार आणि आव्हानात्मक भूमिका निवडणारी मुक्ता बर्वे ‘माया’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स निर्मित ‘माया’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. येत्या २७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भूमिकांच्या निवडीत नेहमीच वेगळेपण जपणारी मुक्ता बर्वे ‘माया’मध्ये प्रमुख आणि प्रभावी भूमिकेत झळकणार आहे. पोस्टरमध्ये मुक्तासोबत सिद्धार्थ चांदेकर, रोहिणी हट्टंगडी आणि डॉ. गिरीश ओक अशी तगडी कलाकारांची फळी दिसत असून, या चित्रपटाची कथा नेमकी काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, घोषणेआधीच ‘माया’ने आंतरराष्ट्रीय झेप घेतली आहे. या चित्रपटाची निवड २४ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये झाली असून, ही बाब ‘माया’च्या आशयघन आणि दर्जेदार कथानकाची साक्ष देते. चित्रपटाची घोषणा आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड एकाचवेळी समोर आल्यामुळे ‘माया’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मुक्ता बर्वेचा प्रत्येक चित्रपट हा अभिनयाचा नवा अनुभव असतो. त्यामुळे ‘माया’मधील तिच्या भूमिकेकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, “ ‘बिन लग्नाची गोष्ट’ च्या सुखद अनुभवानंतर ‘माया’ हा चित्रपट घेऊन येत आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता व पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये निवड होणे या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी अतिशय समाधानकारक आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”
शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स निर्मित माया चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले असून डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार, नितीन प्रकाश वैद्य यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. माया हा चित्रपट येत्या २७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.