Actress Gold Smuggling Scandal: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी अभिनेत्री आणि मॉडेल हर्षवर्दिनी राण्या उर्फ राण्या राव आणि इतरांविरुद्ध १०२.५५ कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. बेंगळुरू येथील विशेष पीएमएलए न्यायालयात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) दाखल केलेल्या आरोपपत्रात अभिनेत्रीसह तरुण कोंडुरु आणि साहिल सकरिया जैन यांचीही नावे दाखल करण्यात आली आहेत.
हे सर्व आरोपी एका मोठ्या सोन्याच्या तस्करी आणि मनी लाँडरिंग रॅकेटशी जोडलेले आहेत. पीएमएलएच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत मनी लाँडरिंग गुन्ह्यांसाठी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) तक्रारीनंतर, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय), एसी-II, नवी दिल्ली यांनी भारतीय दंड संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने आपला तपास सुरू केला.
३ मार्चला सुरु झाला खटला
३ मार्च २०२५ रोजी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हर्षवर्दीन राण्याकडून सुमारे १२.५६ कोटी रुपयांचे १४.२१३ किलो विदेशी सोने जप्त करण्यात आले आणि खटला सुरु करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणातील शोधात २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांचे भारतीय चलन जप्त करण्यात आले. डीआरआयने या प्रकरणात सीमाशुल्क कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत आरोपपत्रही दाखल केले. ईडीच्या मते, त्यांच्या तपासात असे दिसून आले की मार्च २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान सुमारे १०२.५५ कोटी रुपयांचे १२७.२८७ किलो सोने भारतात तस्करी करण्यात आले. ईडीने म्हटले आहे की, 'हे सोनं बेकायदेशीर तस्कर आणि ज्वेलर्सच्या नेटवर्कद्वारे स्थानिक बाजारात विकले गेले आहे."
ईडीने म्हटले आहे की २१ आणि २२ मे २०२५ रोजी कर्नाटकातील १६ ठिकाणी पीएमएलएच्या कलम १७ अंतर्गत केलेल्या छाप्यांमध्ये गुन्हेगारी कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि भारतीय आणि परदेशी चलने जप्त करण्यात आली. पीएमएलएच्या कलम ५० अंतर्गत अनेक व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले. तपासादरम्यान, ईडीने पीएमएलएच्या कलम ५(१) अंतर्गत हर्षवर्दिनी राण्या यांच्या नावावर नोंदणीकृत ३४.१२ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या. एजन्सीने म्हटले आहे की तपासात परदेशातून सोने खरेदी करणे, ते बेकायदेशीरपणे भारतात आयात करणे, ते रोख रकमेसाठी विकणे आणि हवाला आणि बँकिंग चॅनेलद्वारे मनी लाँडरिंग करण्याची चैन उघडकीस आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.