Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

Bhootam Bhayyam: चित्रपट ‘भूतम भयम्’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आता चित्रपटातील आणखी एका महत्त्वाच्या पात्राचा पहिलाच लूक समोर आला आहे.
Bhootam Bhayyam Chhaya Kadam
Bhootam Bhayyam Chhaya Kadamsaam tv
Published On

Bhootam Bhayyam: बहुचर्चित मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम्’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून हा केवळ हॉरर नाही, तर विनोद आणि रहस्य यांचा भन्नाट संगम असणार असल्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. आता चित्रपटातील आणखी एका महत्त्वाच्या पात्राचा पहिलाच लूक समोर आला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. हे पात्र म्हणजे ‘जठाई’!

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये ‘जठाई’चं रूप अंगावर काटा आणणारं दिसत आहे. भयावह चेहरा आणि भेदक नजर यामुळे पोस्टर क्षणात लक्ष वेधून घेतं. विशेष म्हणजे या लूकमध्ये दिग्गज अभिनेत्री छाया कदम यांना ओळखणंसुद्धा कठीण झालं आहे. त्यांच्या कारकिर्दीत प्रथमच त्या अशा पूर्णपणे वेगळ्या आणि धक्कादायक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. चित्रपटात ‘जठाई’ची नेमकी भूमिका काय आहे, ती कथानकात कोणतं रहस्य दडवून ठेवते, याचा उलगडा मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच होणार आहे.

Bhootam Bhayyam Chhaya Kadam
Actor Death: मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा मुंबईत पेट्रोल पंपावरच मृत्यू; नेमकं काय घडलं

याविषयी दिग्दर्शक रामचंद्र अरूण गांवकर म्हणाले, '‘जठाई’ हे ‘भूतम भयम्’मधील अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे. या पात्राचा लूक जितका भयावह दिसतो, तितकाच त्यामागचा प्रवासही आव्हानात्मक होता. हॉरर आणि कॉमेडी यांचा समतोल साधताना प्रत्येक पात्र वेगळं वाटावं, यासाठी आम्ही विशेष मेहनत घेतली आहे. ‘जठाई’चं रहस्य प्रेक्षकांना चित्रपट पाहाताना अनुभवायला मिळेल.'

Bhootam Bhayyam Chhaya Kadam
Sairat 2: 'सैराट २' येणार का? नागराज मंजुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले, 'चांगली कथा असेल तरच...'

छाया कदम आपल्या भूमिकेबद्दल म्हणाल्या, “कलाकार म्हणून कायमच मला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते. अशी वेगळी आणि आव्हानात्मक व्यक्तिरेखा आपल्या वाट्याला यावी, अशी माझी नेहमीच अपेक्षा असते. 'भूतम भयम'मधील ‘जठाई’ ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात वेगळ्या भूमिकांपैकी एक आहे. तिचं दिसणं, बोलणं, हसणं, चालणं या प्रत्येक गोष्टीवर मला विशेष मेहनत घ्यावी लागली. विशेष म्हणजे ती गिब्रिश भाषेत बोलते आणि ती भाषा आत्मसात करणं माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. मात्र यासाठी संपूर्ण टीमने मला खूप साथ दिली. या भूमिकेसाठी दररोज सुमारे साडेतीन तास प्रोस्थेटिक मेकअप करावा लागायचा आणि तो काढायलाही जवळपास तितकाच वेळ जायचा. इतका जड मेकअप आणि वेशभूषा परिधान करून काम करणं शारीरिकदृष्ट्याही खूप आव्हानात्मक होतं. माझ्या प्रत्येक हालचालींवर मर्यादा यायच्या, पण ‘जठाई’चं व्यक्तिमत्त्व पडद्यावर प्रभावी दिसावं यासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली. अशा वेगळ्या भूमिका साकारताना कलाकार म्हणून वेगळंच समाधान आणि आनंद मिळतो. प्रेक्षकांना ‘जठाई’चा लूक आणि तिचं रहस्यमय व्यक्तिमत्त्व नक्कीच लक्षात राहील, असा मला विश्वास आहे.”

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केले असून, नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. चित्रपटात प्रेक्षकांची लाडकी ‘ऑरेंज ज्यूस गँग’ अर्थात करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे आणि अभिनेता मनमीत पेम, पुष्कराज चिरपुटकर यांची जबरदस्त स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com