छोट्या पडद्यावरील 'आई तुळजाभवानी' ही मालिका 3 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. मालिकेत अभिनेत्री पूजा काळे 'आई तुळजाभवानी'चे पात्र साकारत आहे.'आई तुळजाभवानी' ही मालिका करताना पूजाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तसेच या मालिकेसाठी तिने खास शस्त्र प्रशिक्षणदेखील घेतलं आहे. 'आई तुळजाभवानी' मालिकेसंदर्भात अभिनेत्री पूजा काळेने तिचा प्रवास सांगितला आहे.
नुकतंच एका मुलाखतीत अभिनेत्री पूजा काळेने,'आई तुळजाभवानी' ही संपूर्ण महाराष्ट्राची आराध्यदैवत आहे. या भूमिकेचं मला खूप दडपण आलं होतं. या भूमिकेसाठी 'तुळजा महात्म्य' या पुस्तकाचा मी खूप अभ्यास केला. रिसर्च टीम आणि मकरंद माने यांच्यासोबत चर्चा करून, अभ्यास करत मी पात्र साकारत गेले. त्याचा मला खूप फायदा झाला. मी लहानपणापासून भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. दररोज न चुकता मी रियाज करते.
कोणतंही शस्त्र चालवण्याची एक खास पद्धत असते. त्यानुसार देहबोलीत फरक पडत असतो. त्यानुसार दानपट्टी, तलवारबाजी, लाठीकाठीचे प्रशिक्षण घेऊन त्याची तालिम करत राहिलो. त्याचा फायदा असा झाला की हालचाल करताना सहजता आली. खोटं न वाटता त्यात खरेपणा यावा यासाठी शस्त्रप्रशिक्षण खूप जास्त गरजेचं आहे. दोन्ही हातांनी तलवारबाजी करणं आणि त्रिशूल घेऊन युद्ध हे दोन्ही एकसाथ करणं खूप चॅलेंजिंग वाटलं. फक्त युद्ध नव्हतं..तर सहा-साडे सहा फुटांच्या राक्षसांसोबत युद्ध होतं. दमायला व्हायचं..पण सेटवरील सर्वांनी माझा उत्साह टिकवला.
युद्धाच्या तयारीबाबत आम्ही बेसिक कोरिओग्राफी करुन व्हिडीओ रेकॉर्ड करतो. त्यामुळे शूटिंग करताना काहीही अडचण येत नाही. मकरंद सर आणि त्यांची टीम खूप सॉर्टेड आहे. त्यामुळे एखादा सीन वेळेत होण्यास मदत होते. चारित्र्याची ताकद आणि व्यक्तिमत्त्वबद्दल बोलताना पूजा काळे म्हणाली,'आई तुळजाभवानी' ही जगाची आई असून एक थोर योद्धा आहे. जी असूरांशी लढते..तिच्या चारित्र्याची ताकद आणि व्यक्तिमत्त्व खूप थोर आहे".
अनेकदा सतत शूट असल्यामुळे थकवा जाणवतो. पण नवीन सीन हातात आल्यानंतर एक नवेपणा येतो. उत्साह येतो. मानसिकतेसाठी तर 'आई तुळजाभवानी' स्वत: माझ्यासोबत आहे असं मला जाणवतं. कारण ही भूमिका साकारताना मन आणि डोकं खूप शांत ठेवावं लागतं. मन शांत ठेवण्यासाठी गायत्रीमंत मी मनात बोलत असते.
'आई तुळजाभवानी' मालिकेची संपूर्ण टीम अनुभवावी आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा मला सतत होत आहे. दिग्दर्शक मकरंद माने सर, विक्रम पाटील सर, डीओपी शेखर नगरकर सर अशी अनेक मंडळी सातत्याने मार्गदर्शन करत आहेत. एखादा सीन समजावताना मकरंद माने सर छोट्या-छोट्या गोष्टींवर खूप भर देतात. सीनमधील प्रत्येक गोष्टीवर त्यांचं खूप बारकाईने लक्ष असतं. सगळेच खूप मदत करणारे आहेत. 'आई तुळजाभवानी'ची ख्याती महिषासूर, मर्दिनी आहे. तोच धागा पकडून योद्धा असणारी तुळजाभवानी मांडली जात आहे. मालिकेबद्दलची आता खूप उत्सुकता आहे.