सांस्कृतिक आणि कलाविषयक उपक्रम केवळ पुणे - मुंबईतच घडू शकतात असे नाही, हे अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने (Ajintha Verul Film Festival) दाखवून दिले आहे. विशेषत : मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर करण्याचे काम या महोत्सवाने केले असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण सई परांजपे यांनी यावेळी केले.
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द व ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या व चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पैठणीचा शेला, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि २ लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी, पद्मभूषण सई परांजपे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, फ्रिप्रेसी ज्यूरी चेअरपर्सन लतिका पाडगांवकर, अभिनेत्री सीमा बिस्वास, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
पद्मभूषण सई परांजपे (Padma Bhushan Sai Paranjpye) म्हणाल्या, "आज इथे बोलत असताना नित्याचं साचेबंद वक्तव्य टाळून मी एवढेच म्हणते की, आजवर मी केलेल्या कामाची उशिरा का होईना पण दखल घेतली आणि आज मला हा मोठा आणि सुंदर असा ‘पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार’ सन्मान देऊन केला, त्याचा मी अतिशय आनंदाने आणि नम्रपणे स्वीकार करते. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एका वेगळ्या धारणेने सुरू झालेला असून मराठवाड्यामधल्या रसिकाला खास आपला वाटेल असा हा उत्सव आहे."
शेवटी त्या म्हणाल्या, "आनंदाची गोष्ट अशी की गेल्या वीस वर्षामध्ये मराठी सिनेमाला उभारी आली असून आज वर्षाला किमान ५०-६० मराठी चित्रपट जन्माला येतात. आणि विशेष म्हणजे त्यातील अनेक सिनेमे शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या मातीमधून निपजतात. होतकरू दिग्दर्शकाला वाटणारी तळमळ, खाजगी व्यथा, सामाजिक पोटतिडीक अशा जाणिवामधून यातल्या बऱ्याच सिनेमांचा जन्म होतो. त्यातले काहीतरी तांत्रिकदृष्ट्या थोडे कच्चे असले तरी आशयाला पक्के असल्यामुळे हे सिनेमे थेट भिडतात. पण या सिनेमंडीमधून नानाविध विषयांना वाचा फुटली असल्याचे परांजपे म्हणाल्या."
अपर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले, "चित्रपट हे महत्त्वपूर्ण क्षेत्र असून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सॉफ्ट पॉवर म्हणून सिनेमा काम करत असतो. महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहेत, ही निश्चितपणे आनंदाची बाब आहे. या माध्यमातून आपल्याला भारतीय सिनेमासह आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहता येतात. अशा महोत्सवात सेलिब्रेटी, क्रिएटिव्हिटी आणि कॉमर्स हे तीन सी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. चित्रपट बनविणाऱ्या मंडळींना महाराष्ट्र शासन कायम सहकार्य करीत आले असून अनेक प्रोत्साहानपर योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरवर्षी मराठी सिनेमाला महाराष्ट्र शासनाच्यावतीने १०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते."
भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी १०५ वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला प्रसिध्द मुकपट कालिया मर्दन याचे विशेष प्रदर्शन उद्घाटन सोहळ्याआधी दाखविण्यात आला. शंभर वर्षांपूर्वीचा मुकपट प्रत्यक्ष संगीताद्वारे रसिकांना अनुभवता यावा म्हणून कालिया मर्दन हा मुकपट कोलकाता येथील सतब्दीर सब्द या वाद्यवृंद समूहातर्फे सादरीकरणाद्वारे दाखविला गेला. या समूहामध्ये सात्यकी बॅनर्जी, सुचल चक्रवर्ती, तीर्थंकर बॅनर्जी, सुमंत्र गुहा, सौमाल्य सरेश्वरी, अरुणभा गुप्ता, दिव्यकमल मित्र आणि स्वरूप मुखर्जी आदि कलाकारांचा समावेश होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.