सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे
आयटी हब, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या पुणे शहराची मात्र आता 'गुन्हेगारांचे शहर' अशी ओळख निर्माण होऊ पाहत आहे. कारण मागील आठ महिन्यांत शहरात तब्बल ६५ जणांचे खून झाले. तर ९९ जणांवर जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच वनराज आंदेकर खून प्रकरणामुळे टोळीयुद्धाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जातेय. या परिस्थितीत पोलिसांसमोर गुंडांवर अंकुश ठेवण्याचं मोठं आव्हान असल्याचं दिसतंय.
दिवसेंदिवस पुणे शहराच्या आकाराच्या तुलनेत लोकसंख्या देखील वाढतेय. नोकरीनिमित्ताने शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातूनच गुन्हेगारी देखील वाढीस लागतेय. पूर्ववैमनस्य असलेल्या टोळक्यांकडून दबदबा कायम ठेवण्यासाठी गुन्हेगारी कृत्य केली जातात. त्यातूनच दोन टोळ्यांच्या संघर्षात नजरेला नजर भिडताच बंदूकीचा बार अन् कोयत्याचा वार काढला (Pune Crime News) जातो.
शहरातील खुनाच्या आणि खुनाच्या प्रयत्नाच्या बहुतांश घटनांमध्ये कोयत्याचा वापर केल्याचं दिसून येतंय. कोयता गुन्हेगारांना सहजासहजी उपलब्ध होतो. आंदेकर यांचा खून करण्यासाठी जरी गोळ्या झाडण्यात आल्या असल्या तरी कोयत्याने वार करून त्यांना संपविण्यात आलं. त्यामुळे पुढील कालावधीत कोयत्यावर देखील पोलिसांना लक्ष ठेवावं लागणार आहे. किरकोळ कारण, अनैतिक संबंध, वर्चस्ववाद, प्रेमसंबंध अशा कारणांमुळे खून प्रकरण वाढत असल्याचं दिसत (Pune News) आहे. १ जानेवारी ते ३ सप्टेंबर २०२४ दरम्यान परिमंडल एक ०६, परिमंडल दोन ०८, परिमंडल तीन ११, परिमंडल चार २१, परिमंडल पाच २१ अशा घटना घडलेल्या आहेत. दरम्यान, २०२३ मध्ये शहरात १०२ खुनांच्या तर २३९ खुनाच्या प्रयत्नाच्या घटना घडल्या. ऑगस्ट २०२४ अखेर ५९ जणांचे खून झाले. तर १४४ जणांवर खुनी हल्ले झाले.
शहरात बेकायदा पिस्तुलांचा मुद्दा ऐरणीवर आहे. पोलिसांकडून यासंदर्भात कारवाई केली जातेय. मात्र, शहरात आढळून येणारे गावठी कट्टे आणि त्यातून होणारे गोळीबार चिंताजनक आहेत. चालू वर्षातील आठ महिन्यात शहरात गोळीबाराच्या १९ घटना (Crime News) घडल्या. २०२३ मध्ये हेच प्रमाण २२ होते. तर २०२२ मध्ये २६ जणांवर गोळीबार (65 People Killed) झाले. कोथरूडमध्ये शरद मोहोळ आणि नानापेठेत वनराज अदिकर यांचा खून करण्यासाठी आरोपींनी दिवाळीचे फटाके फोडाने तशा गोळ्या झाडल्या. वनराज यांच्या खुनासाठी एका वर्षापूर्वीच पाच ते सहा पिस्तुले आणून ठेवण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली. पोलिसांना या पिस्तुलांचा सुगावा लागला नाही. त्यामुळे शहरात बेकायदा पिस्तुलांचे पेव मोठे असल्याचे दिसून येते. गत वर्षीच्या तुलनेत सहा खून शहरात जास्त झाले आहेत. २०२२ मध्ये हेच प्रमाण १०८ खून तर ३४६ खुनाचे प्रयत्न असे होते.
दारूसाठी पैसे दिले नाही, म्हणून मारहाण करत नागरिकांना लुटले जाते. तर मोबाईलचे हॉटस्पॉट दिले नाही म्हणून कोयत्याने डोके तोडले जाते. दहशतीसाठी सर्व सामान्यांची वाहने फोडून पिस्तुलातून बार काढला जातो. या घटना पुण्याच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी धोकादायक आहेत. तर दुसरीकडे थेट पोलीस अधिकाऱ्यांवरच कोयत्याने वार करण्यापर्यंची मजल गुन्हेगारांची होत आहे. यावरून गुन्हेगारांना कोणाचा धाक आहे की नाही? असा सवाल उपस्थित होतोय.
पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर वासुदेव या व्यक्तीचा कोयत्याने चेहरा छिन्नविछीन्न करून खून करण्यात आला. तर दोन दिवसांपूर्वी डायसप्लॉट गुलटेकडी येथे मोक्कातून जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीने एकाचा गळा चिरून खून केला. सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे खून झालेल्या व्यक्तीच्या घरातील चार ते पाच लोक त्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात संधी मिळताच सराईताने व्यक्तीचा गळा चिरला. कारागृहातून बाहेर आल्यानंतरही गुन्हेगारांची मजल वरचढ होत आहे. यामुळे पोलिसांनी यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.