पुणे जिल्ह्यातील भिगवण परिसरात तरुणीचे अपहरण
आई व भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून अपहरण
पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
परिसरात तणावाचे वातावरण
विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात एका तरुणीचे तिच्याच आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदापूर व दौंड तालुक्याच्या सीमेवर भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास सदर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास पीडित तरुणी, तिचा भाऊ आणि आईसोबत दुचाकीवरून घराकडे जात होते. या दरम्यान भिगवण शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला दोन तरुणांनी त्यांची दुचाकी अडवून तरुणी, तिची आई आणि भावाच्या डोळ्यांमध्ये मिरची पूड टाकून तरुणीचे जबरदस्तीने अपहरण केले. घडलेल्या घटनेबाबत तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. अपहरणाच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या सूचना दिल्या.
पुणे व परिसरामध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना केली आहेत. तसेच या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यामध्ये दौंड तालुक्यातील जहीर हारुण शेख व आयान हारुण शेख यांच्याविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला तातडीने पकडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
या घटनेमुळे भिगवण पोलिस ठाणे, भिगवण बस स्थानक परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. तणावाची स्थिती लक्षात घेऊन येथील भिगवण पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी पोलिस बंदोबस्तात वाढ केली होती. भिगवण पोलिस पुढील तपास करीत असून तातडीने तरुणीचा शोध घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.