

साम टिव्ही, संजय गडदे
सध्या लोकलमध्ये गुन्हे घडण्याचा आकडा वाढताना दिसतोय. लोकलमध्ये किरकोळ वाद झाल्यामुळे लोक एकमेकांचा जीव घेतानाच्या घटना समोर येत आहेत. असाच एक गंभीर प्रकार नालासोपाऱ्यात घडला आहे. नालासोपाऱ्याला जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये दरवाजा उघडा ठेवण्यावरून वाद झाला आणि त्यामध्ये २१ वर्षीय मयंक लोहार याची निर्घृण हत्या करण्यात आली. २३ जून रोजी मुसळधार पावसात हा प्रकार घडला असून या प्रकरणात शासकीय रेल्वे पोलिसांनी (GRP) मुंबईतल्या न्यायालयात तब्बल ११०० पानी आरोपपत्र दाखल केले.
दरवाजा उघडा ठेवण्यावरून वाद
पोलिसांनी केलेल्या तपासात ६८ साक्षीदारांचे जबाब, प्रवाशांनी मोबाईलमध्ये केलेली व्हिडिओ रेकॉर्डिंग, तसेच घटनास्थळ आणि हत्येच्या शस्त्राशी संबंधित फॉरेन्सिक पुरावे महत्त्वाचे ठरले आहेत. २३ जून रोजी मुसळधार पाऊस सुरू असताना मयंक लोहार हा नालासोपारा दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये प्रवास करत होता.
पावसामुळे लोकलच्या डब्यात दरवाजे उघडे ठेवण्यावरून प्रवाशांमध्ये वाद निर्माण झाला. याच वादातून मयंक आणि आरोपी रोशन सुवर्णा यांच्यात बाचाबाचीला सुरूवात झाली. वाद वाढल्यानंतर आरोपीने मयंकवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे डब्यात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या मयंकचा उपचारादरम्यान/हल्ल्यानंतर मृत्यू झाला.
प्रवाशांच्या मोबाईल व्हिडिओमुळे तपासाला महत्त्वाचा आधार
घटनेनंतर GRPने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. लोकलमधील प्रवासी, प्रत्यक्षदर्शी आणि उपलब्ध व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या आधारे घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तपासादरम्यान ६८ साक्षीदारांचे जबाब आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहेत.
प्रवाशांनी केलेल्या मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंगचा तपासात महत्त्वपूर्ण वापर करण्यात आला. याशिवाय घटनास्थळावरील परिस्थिती, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर तांत्रिक पुरावेही तपासाचा भाग बनवण्यात आले.
बोरीवलीजवळून चाकू जप्त
हत्येनंतर वापरण्यात आलेला १७.५ सेंटीमीटर लांबीचा चाकू बोरीवलीजवळून जप्त करण्यात आला. या चाकूवरील फॉरेन्सिक पुरावे तपासात महत्त्वाचे ठरले आहेत. शस्त्रावरील पुरावे आणि उपलब्ध वैज्ञानिक तपासणीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्धचा पुरावा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
आरोपी रोशन सुवर्णा न्यायालयीन कोठडीत
या प्रकरणातील आरोपी रोशन सुवर्णा याला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरुद्ध मयंक लोहारच्या हत्येचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. GRPने तपास पूर्ण करून न्यायालयात सुमारे ११०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात प्रत्यक्षदर्शींचे जबाब, व्हिडिओ रेकॉर्डिंग, फॉरेन्सिक पुरावे आणि अन्य तपासातील कागदपत्रांचा समावेश आहे.
जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी
तरुणाची रेल्वे प्रवासादरम्यान झालेली हत्या आणि या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली आहे. तसेच प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. आता ११०० पानी आरोपपत्र, ६८ साक्षीदारांचे जबाब आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयीन प्रक्रियेत या हत्येचा निकाल काय लागतो, याकडे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.