
संजय गरदे / साम टीव्ही न्यूज
मुंबईत मागील काही दिवसांपासून घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अंधेरी पोलिसांनी अशाच प्रकारच्या घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला उत्तर प्रदेश शहाजहानपूर येथुन अटक केली आहे. उबेद हैदरअली खान (२५ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपीकडून अंधेरी पोलिसांनी चोरीतील गेलेला मुद्देमाल आणि रक्कमेपैकी साडेचार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम २० हजार रुपये हस्तगत केले आहे. सध्या आरोपी अंधेरी पोलिसांच्या ताब्यात असून उर्वरित मुद्देमाल आणि रक्कम त्याने कोणाकडे दिली याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेकडील चकारा पारशी वाडा परिसरातील २/१, सकीनाबाई चाळीतील घरात १३ एप्रिल आणि १४ एप्रिलच्या दरम्यान मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून अँजेलो केजीटन डिसोजा (फिर्यादी) व त्यांचे शेजारी राहणारे अतिश वालावलकर, योगेश देवरस व क्लोरी अनिल डिसोजा यांचे राहत्या घराचे बंद दरवाज्याचा कडीकोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करून अंदाजे एकूण आठ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली. याबाबत १४ एप्रिल रोजी एंजेलो डिसूजा यांचे तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात कलम ४५४, ४५७, ३८० भा.द.वि नुसार गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त परिमंडळ १० सचिन गुंजाळ, पोलीस सह आयुक्त अंधेरी विभाग डॉ. शशिकांत भोसले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याच्या तपासासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. पो.नि पाटील (गुन्हे) यांनी गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक परकाळे यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने वरिष्ठांनी योग्य त्या सूचना देऊन आरोपीला शोधण्याचे आदेश दिले. तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक परकाळे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या दोन टीम बनवून सरकारी तसेच प्रायव्हेट सीसीटीव्ही फुटेजचा तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करून गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली असता आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समजले.
गुन्हा घडल्यानंतर दोन दिवसांनीच आरोपी हा रेल्वेने दरभंगा, बिहार या ठिकाणी जात असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी चांदोली रेल्वे पोलीस ठाणे, वाराणसी यांना त्याबाबत माहिती दिली असता त्यांनी आरोपीस रेल्वेमध्ये ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो त्यांच्या हातून पळून गेला. त्यानंतर आरोपी कुठे गेला याबाबत कसलीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. आरोपी मोबाईल वापरत नसल्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा काही समजत नव्हते.
मागील दहा ते अकरा महिने सतत त्याची गुप्त बातमीदाराद्वारे माहिती काढली असता तो दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार अशी वारंवार ठिकाणे बदलत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर १० फेब्रुवारी २०२५ रोजी सदर आरोपी हा शहाजानपूर, उत्तर प्रदेश या ठिकाणी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठांचे परवानगी घेऊन पो.उपनि. परकाळे, पो.ह. पेडणेकर, सूर्यवंशी, शिंदे, पो.शि. लोंढे, म्हात्रे, मोरे, बाबर, म.पो.शि. गोम्स (तांत्रिक मदत) या पथकाने उत्तर प्रदेश शहाजानपूर येथे जाऊन सलग तीन दिवस सापळा रचून आरोपी उबेद हैदर अली खान याला ताब्यात घेऊन अटक केली.
आरोपीला अटक केल्यानंतर काल त्याला अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या आरोपी अंधेरी पोलिसांच्या ताब्यात असून आरोपीने घरफोडीत लुटलेल्या उर्वरित मुद्देमालाबाबत अधिक चौकशी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.