NPCI कडून B2B UPI व्यवहारांसाठी नवीन शुल्काचा प्रस्ताव
प्रत्येक व्यवहारासाठी केवळ ५ रुपये शुल्क आकारण्याचा विचार
व्यवहाराची रक्कम कितीही असली तरी शुल्क समान ठेवण्याचा प्रस्ताव
यापूर्वी काही व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के MDR शुल्काची तरतूद होती
देशभरात UPI चा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. किरकोळ दुकानदारांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत अनेक जण पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी डिजिटल पेमेंटचा वापर करतात. अशातच व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता व्यापाऱ्यांमधील UPI व्यवहारांवर आकारले जाणारे शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून करण्यात आलेल्या या प्रस्तावानुसार, B2B व्यवहारांसाठी प्रत्येक व्यवहारामागे केवळ ५ रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. विशेष म्हणजे, व्यवहाराची रक्कम कितीही असली तरी हे शुल्क समान राहणार आहे. यापूर्वी मोठ्या व्यवहारांवर ३०० रुपयांपर्यंत शुल्क लागू होण्याची शक्यता होती.
याआधी जाहीर करण्यात आलेल्या पेमेंट नियमांनुसार, २ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या काही व्यापारी UPI व्यवहारांवर ०.४ टक्के MDR शुल्क आकारण्याची तरतूद होती. या शुल्काची कमाल मर्यादा ३०० रुपये ठेवण्यात आली होती. यामुळे घाऊक विक्रेते आणि किरकोळ दुकानदारांना मोठ्या रकमेचे पेमेंट करताना जास्त शुल्क भरावे लागू शकण्याची शक्यता होती.
उदाहरणार्थ, ७५ हजार रुपयांच्या बिलावर ३०० रुपयांपर्यंत शुल्क लागू होण्याची शक्यता होती. मात्र आता नव्या प्रस्तावामुळे ही चिंता कमी होऊ शकते. कारण B2B व्यवहारांसाठी शुल्क थेट ५ रुपये निश्चित करण्याचा विचार सुरू आहे. म्हणजेच प्रत्येक मोठ्या व्यवहारामागे व्यापाऱ्यांची २९५ रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. या प्रस्तावाचा फायदा घाऊक विक्रेते, किरकोळ दुकानदार आणि B2B ऑनलाइन मार्केटप्लेसवर व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांना होऊ शकतो. व्यापाऱ्यांमधील पैशांची देवाणघेवाण अधिक सोपी आणि कमी खर्चाची होण्यास मदत मिळू शकते. मात्र, या नवीन शुल्काची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होणार, याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.