मुंबई : शेअर बाजारात सातत्याने होणाऱ्या चढ-उतारामुळे गुंतवणूकदार हैराण झाले आहेत. आठवड्यातील दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी बाजारातील दोन्ही इंडेक्स ग्रीन झोनमध्ये होते. मात्र, दुपारी १२ वाजल्यानंतर बाजारात अचानक पडझड पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे ३० शेअरचे सेन्सेक्स 500 अंकानी घसरले. तर निफ्टी देखील १२० अंकानी घसरला आहे.
शेअर बाजारात मंगळवारी सकाळच्या सत्रात व्यवहारात चढ-उतार दिसला. बीएसई सेन्सेक्सचा ७९,६०० पार व्यवहार सुरु होता. शेअर बाजार सुरु झाल्यानंतर बीएसई इंडेक्सने २९१ अंकांनी उसळी घेतली. काही वेळेपर्यंत उसळी कायम होती. मात्र, दुपारी १२ वाजल्यानंतर व्यवहारात मोठी पडझड पाहायला मिळाली. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान सेन्सेक्स ५२० अंकांनी घसरून ७८,९७५ पर्यंत पोहोचला.
सेन्सेक्ससह निफ्टी इंडेक्सची उसळी कायम राहिली नाही. एनएसई निफ्टी ८७ अंकांनी घसरून २४,२२८ या पातळीवर पोहोचला. बातमी लिहिताना निफ्टी इंडेक्स २४००० अंकांच्या खाली पोहोचला होता. इंडेक्स १४७.४५ अंकांनी घसरून २३,९९४.८५ वर पोहोचला.
शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याने काही कंपन्यांचे शेअर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. त्यात एचडीएफसी बँक ते टाटा मोटर्सपर्यंतचे शेअर आहेत. Britannia शेअर हा ४.९५ टक्क्यांनी घसरून ५१५७ रुपयांवर व्यवहार सुरु होता. एचडीएफसी बँक शेअर (२.४९ टक्के), बजाज फायनान्स शेअर(२.०६ टक्के), टाटा मोटर्स शेअर (२ टक्के), एशियन पेन्ट्स (१.६८ टक्के) घसरून व्यवहार करत होते.
शेअर बाजारात मंगळवारी सुरुवातीला उसळी होती. मात्र, तज्ज्ञांकडून बाजारात पडझड होणार असल्याची शक्यता वर्तवली होती. परकीय गुंतवणूक भारतात होत नाही, तोपर्यंत शेअर बाजारात दबाव पाहायला मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच अमिरेकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारच्या धोरणांचाही शेअर बाजारावर परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याने गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.