DoT new SIM card rules : सायबर गुन्हे आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने एका व्यक्तीच्या नावावर असणाऱ्या सिम कार्डच्या संख्येवर मर्यादा निश्चित केली आहे. एका व्यक्तीच्या नावावर किती सिम कार्ड असावेत, त्याबाबत नवीन नियम आणले आहेत. दूरसंचार विभागाने (DoT) सिम कार्ड वापरकर्त्यांसाठी नवीन आणि कडक नियमावली जाहीर केली आहे. (New SIM Card Rules From August 24)
नवीन नियमांनुसार, एक सामान्य नागरिक आपल्या नावावर जास्तीत जास्त ९ सिम कार्ड खरेदी करू शकतो. पण आसाम, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांसाठी ही मर्यादा ६ सिम कार्ड आहे. जर तुमच्या नावावर या मर्यादेपेक्षा जास्त सिम कार्ड सुरू असतील, तर अतिरिक्त सिम कार्ड्सचे कनेक्शन खंडित (Suspend) केले जाईल. त्यामुळे तुमच्या नावावर किती सिम कार्ड सक्रिय आहेत हे तपासा आणि अनावश्यक सिम कार्ड्स वेळेत बंद करून घ्या.
ऑनलाइन फसवणूक आणि सायबर फसवणूक रोखण्यासाठी, दूरसंचार विभागाने (DoT) दूरसंचार कंपन्यांना कडक सूचना जारी केल्या आहेत. हा नियम २४ ऑगस्टपासून लागू होईल. यानुसार, ज्या ग्राहकांच्या नावावर ९ सिम कार्ड सक्रिय आहेत, त्यांना नवीन सिम कार्ड मिळणार नाही. यामुळे एकापाठोपाठ एक सिम कार्ड खरेदी करून लोकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या घोटाळेबाजांना आळा बसेल.
दूरसंचार विभागाच्या (DoT) एका परिपत्रकानुसार, सर्व दूरसंचार कंपन्यांना सिम कार्ड जारी करण्यासंदर्भात कठोर तांत्रिक उपाययोजना करणे बंधनकारक असेल. २४ तारखेपासून जर एखाद्या ग्राहकाने नऊ सिम कार्डांची मर्यादा ओलांडली, तर त्यांना नवीन कनेक्शन नाकारले जाईल. अशा परिस्थितीत कंपनी ग्राहकाला कळवेल की त्यांनी कमाल मर्यादा ओलांडली आहे आणि त्यांना नवीन कनेक्शन दिले जाऊ शकत नाही.
या नव्या नियमासाठी दूरसंचार विभागाने (DoT) कंपन्यांना डीआयपी (DIP), म्हणजेच डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म वापरण्यास सांगितले आहे. सर्व कंपन्यांचा ग्राहक डेटा या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्याशिवाय २३ ऑगस्टपासून, ज्यांच्याकडे आधीपासूनच नऊ सक्रिय सिम कार्ड आहेत, त्या सर्वांचे फोटो आणि नोंदी डीआयपीवर उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे कंपन्यांना कोणत्या ग्राहकाला नवीन सिम देऊ नये, हे त्वरित ओळखणे शक्य होईल.
दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या प्रणाली डीआयपी पोर्टलशी एकीकृत करून प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासही सांगितले आहे. अहवालानुसार, या निर्णयामुळे बनावट कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड मिळवणाऱ्यांना आळा बसेल.
तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहेत?
दूरसंचार विभागाने (DoT) सर्व नागरिकांना त्यांच्या नावावर (आयडीवर) किती सिम कार्ड जारी झाली आहेत, याची त्वरित तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. अनेकदा आपल्या नकळत किंवा जुनी कागदपत्रे वापरून सायबर भामटे दुसऱ्याच्याच नावावर बनावट सिम कार्ड सक्रिय करतात आणि त्याचा गैरवापर करतात. असा कोणताही धोका टाळण्यासाठी आपल्या नावावरील सिम कार्ड तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सर्वात आधी दूरसंचार विभागाच्या अधिकृत TAFCOP Portal वर जा.
तेथे तुमचा १० अंकी सक्रिय मोबाईल नंबर आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा (Captcha) कोड टाकून एंटर करा.
त्यानंतर 'Validate Captcha' किंवा 'Request OTP' वर क्लिक करा.
तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) प्रविष्ट करा आणि लॉगिन प्रक्रियेवर सबमिट करा.
लॉगिन होताच तुमच्या आयडीवर (नावावर) नोंदणीकृत असलेल्या सर्व सक्रिय मोबाईल क्रमांकांची यादी स्क्रीनवर दिसेल.
अनोळखी नंबर दिसल्यास काय करावे?
या यादीत जर तुम्हाला असा एखादा नंबर दिसला जो तुम्ही वापरत नाही किंवा तो तुमचा नाहीच, तर तुम्ही थेट पोर्टलवरूनच त्याची तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला 'Not My Number' किंवा 'Not Required' हा पर्याय निवडावा लागेल.
तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित नंबर वापरणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या नावाने नवीन केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल; अन्यथा तो नंबर कायमचा बंद केला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.