संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी
Gold- Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात येत आहे. मुंबई, पुण्यापासून दिल्ली अन् चेन्नई कोलकात्यामध्ये सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. वायदा बाजारात सोन्याचे दर गगणाला भिडले आहेत. अस्थिर आतंरराष्ट्रीय बाजारामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे लग्नसराईत सोन्याच्या दराने उच्चांक गाठलाय. महाराष्ट्रातील सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात सोन्याची किंमत २४ तासात १,९०० रूपयांनी वाढली आहे. तर चांदी तब्बल २३ हजारांची वाढली आहे. या वाढीनंतर ग्राहकांच्या खिशाला चाप बसलाय, तर गुंतवणूकदारही चक्रावले आहेत. पुढील काही दिवसांत सोनं आणि चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुवर्णनगरी जळगावात सोने-चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. एका दिवसात सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅममागे एक हजार ९०० रुपयांची, तर चांदीच्या भावात प्रति किलोमागे २३ हजारांची (विनाजीएसटी) वाढ झाली. एकाच दिवसातील भाववाढीने गुंतवणूकदार हैराण झाले आहेत. सुवर्ण व्यावसायिकांच्या म्हणण्यांनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणाम देशांतर्गत सुवर्ण बाजारावरही होत आहे. रुपयातील चढ-उतार, आयात शुल्क आणि स्थानिक मागणी या घटकांमुळे भारतात सोन्याचे भाव उच्च पातळीवर पोहोचले आहेत.
लग्नसराई, सणासुदीची खरेदी आणि गुंतवणूक, म्हणून सोन्याला असलेले पारंपरिक महत्त्व यामुळेही देशांतर्गत मागणी मजबूत राहण्याची शक्यता आहे. जागतिक राजकीय तणाव, फेडरल रिझर्व्हच्या धोरणांची अनिश्चितता, वाढती औद्योगिक मागणी आणि मर्यादित पुरवठा या सर्व कारणांमुळे सोने आणि चांदीच्या भावात सध्या मोठी तेजी पाहायला मिळत आहे आणि ही स्थिती काही काळ टिकण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोबतच अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील संबंध सध्या तणावपूर्ण अवस्थेत आहेत. निर्बंध, तेल निर्यात, राजकीय हस्तक्षेप आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे या तणावात वाढ होत आहे. व्हेनेझुएला तेल समृद्ध राष्ट्र असल्यामुळे या घडामोडींचा मोठा परिणाम जागतिक बाजारावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण होत असल्याची माहिती सुवर्ण अभ्यासकांनी दिली.
देशभरात चांदीचे भाव दिवसेंदिवस रेकॉर्ड ब्रेक वाढत आहेत. खामगाव येथील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेत चांदीचा आजचा भाव हा 2,63,000 रु GST सह प्रति किलो झालेला आहे. आज वरचा हा सर्वात उच्चांकी भाव असल्याचं चांदीचे व्यापारी सांगतात. जगभरातील राजकीय परिस्थिती व विकसित देशांमध्ये लागलेल्या व्यावसायिक स्पर्धेमुळे हा भाव सातत्याने वाढत असल्याचं जाणकार सांगत आहेत.1 जानेवारी 2025 ला प्रतिकिलो 90500 ₹ असलेला चांदीचा भाव आज उच्चांक वाढला आहे. चांदीचा भाव जरी वाढत असला तरीही गुंतवणूकदार चांदीमध्ये गुंतवणूक करत असल्याचं समोर आल आहे, मात्र किरकोळ विक्रीत चांदीची भांडी व दागिने यात भाव वाढल्यामुळे प्रचंड घट झाल्याचंही चांदीचे व्यावसायिक सांगत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.