

भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी एक महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात LNG म्हणजे लिक्विफाइड नॅचरल गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असून भारतीय कंपन्यांना गॅस खरेदी करण्यासाठी गेल्या काही वर्षाच्या तुलनेत जास्त किंमत मोजावी लागत आहे. २०२२ नंतर भारताने केलेली ही सर्वात महाग LNG खरेदी असल्याचं सांगितलं जात आहे. याचा परिणाम भविष्यात घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतींवर होण्याची शक्यता आहे.
सरकारी गॅस कंपनी GAIL India ने सप्टेंबरमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या LNG ची एक खेप स्पॉट मार्केटमधून खरेदी केली आहे. या गॅससाठी कंपनीने २३ डॉलर प्रति MMBtu पेक्षा जास्त किंमत मोजली आहे. त्याचप्रमाणे गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशननेही (GSPC) सप्टेंबर डिलिव्हरीसाठी २३ डॉलर प्रति MMBtu दराने LNG खरेदी केली आहे.
भारतामध्ये सध्या सरकारी गॅस आणि वीज कंपन्यांकडून स्पॉट मार्केटमधून LNG खरेदी केली जाते. फर्टिलायझर कंपन्यांना गॅसचा पुरवठा नियमित आणि सुरळीत ठेवणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. खत निर्मितीसाठी नैसर्गिक गॅस महत्त्वाचा असल्यामुळे सरकारकडून या क्षेत्राला प्राधान्य दिले जात आहे.
भारत साधारणपणे कतारसोबत दीर्घकालीन करार करून LNG आयात करतो. मात्र, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे LNG पुरवठा साखळीवर दबाव वाढला आहे. कतारमधील महत्त्वाच्या LNG निर्यात सुविधांवर झालेल्या हल्ल्यांमुळे तसेच होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतुकीवर परिणाम झाल्याने पुरवठ्याची चिंता वाढली आहे.
LNG खरेदीसाठी भारताला युरोपमधील खरेदीदारांशीही स्पर्धा करावी लागत आहे. युरोपमध्ये नैसर्गिक गॅसच्या किमती पाच महिन्यांच्या उच्चांकावर गेल्याने तेथील LNG मागणी वाढली आहे.
दरम्यान, BPCL नेही स्पॉट मार्केटमधून LNG ची एक खेप खरेदी करण्याचा करार केला आहे. मात्र, या व्यवहारासाठी कंपनीने नेमकी किती किंमत मोजली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. महाग LNG आयात कायम राहिल्यास त्याचा परिणाम देशातील ऊर्जा खर्चावर होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात LPG सिलिंडरच्या किमतींवरही दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सिलिंडरच्या किमती प्रत्यक्षात किती वाढतील, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.