

Latest LPG cylinder rates in Mumbai Pune Delhi : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण होताच गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १ मे २०२६ म्हणजेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial LPG Cylinder) दरात झाली असून, १४ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या (Domestic LPG Cylinder) किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पुणे आणि नाशिकसह मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आता ३,००० रुपयांच्या पार गेली आहे. (Commercial LPG cylinder price hike May 2026 India)
१९ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचा दर एकाच वेळी ९९३ रुपयांनी वाढल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळींमधील जेवण महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह दिल्ली, चेन्नई आणि कोलकात्यात ही दरवाढ लागू झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा आधीच तुटवडा असताना, आता किमतीत प्रचंड वाढ झाल्याने छोट्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. "आम्ही व्यवसाय करायचा कसा?" असा संतप्त सवाल आता हॉटेल व्यावसायिकांकडून विचारला जात आहे.
मे महिना सुरू होताच व्यावसायिक एलपीजी ग्राहकांना हा मोठा धक्का बसला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOC) जाहीर केलेल्या नवीन दरानुसार, दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ९९३ रुपयांची वाढ झाली आहे. या नव्या दरामुळे दिल्लीत एका सिलिंडरची किंमत २,०७८.५० रुपयांवरून थेट ३,०७१.५० रुपये इतकी झाली आहे.
प्रमुख शहरांतील नवे दर:
दिल्ली: व्यावसायिक सिलिंडरची किंमत ९९३ रुपयांनी वाढून ३,०७१.५० रुपये झाली आहे.
कोलकाता: येथे सर्वाधिक ९९४ रुपयांची वाढ झाली असून, आता सिलिंडर २,२०८ रुपयांऐवजी ३,२०२ रुपयांना मिळेल.
मुंबई, पुणे आणि नाशिक: व्यावसायिक सिलिंडरची किंमत ९९३ रुपयांनी वाढून ३,०२४ रुपये झाली आहे.
चेन्नई: येथे व्यावसायिक सिलिंडरसाठी आता ३,२३७ रुपये मोजावे लागणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.