

भारतात सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना सर्वसामान्य ग्राहकांसाठी महागाईची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. डिटर्जंट, डिशवॉशिंग बार, पेंट, टायर तसेच घरगुती वापरातल्या वस्तूंच्या किंमती लवकरच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. वाढत्या कच्चा मालाच्या खर्चामुळे अनेक मोठ्या कंपन्या पुढच्या तिमाहीत उत्पादनांच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.
अमेरिका-इराण संघर्षामुळे मध्येपूर्वेतली परिस्थिती दीर्घकाळ तणावपूर्ण राहिली होती. त्याचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर झाला. कच्चे तेल आणि इतर महत्त्वाच्या कच्चा मालाच्या किमती वाढल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढतो. त्याचा परिणाम ग्राहकांना वाढीव किंमतींच्या स्वरुपात सहन करावा लागू शकतो.
अहवालानुसार, हिंदुस्तान युनिलिव्हर डिटर्जंट आणि डिशवॉशिंग बारसारख्या उत्पादनांच्या किमतींमध्ये मर्यादित वाढ करण्याच्या तयारीत आहे. त्यासोबत डोडला डेअरी, एशियन पेंट्स आणि इतर अनेक कंपन्याही त्यांच्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे रोजच्या वापरातल्या अनेक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे.
देशातली किरकोळ महागाईचे दर जून २०२६ मध्ये ४.३८ टक्क्यांवर पोहोचला असून मे महिन्यात तो ३.९३ टक्के होता. विशेष म्हणजे अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांच्या महागाईतही वाढ झाली आहे. तसेच कमी पावसाची शक्यता, वाढती ऊर्जा किंमत आणि जागतिक पुरवठा साखळीवरचा दबाव यामुळे आगामी महिन्यात महागाईचा ताण आणखी वाढू शकतो.
भारतात ऑगस्ट ते नोव्हेंबर हा सणासुदीचा महिना असतो. त्यामुळे या काळात ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते आणि अनेक कंपन्यांच्या वार्षिक विक्रीतला मोठा हिस्सा याच हंगामात होतो. त्यामुळे वाढलेल्या मागणीसोबत किंमतीत वाढ झाल्याने ग्राहकांच्या खर्चावर जास्त ताण येऊ शकतो.
दरम्यान, ३ ते ५ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. मागील बैठकीत रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला होता. यावेळीही व्याजदरात मोठा बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र जागतिक तेलाच्या किमती, मान्सूनची स्थिती आणि महागाईचा पुढील कल लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक भविष्यातले धोरण ठरवणार असल्याचं मानलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.