

हिंदुजा ग्रुपचे चेअरमन गोपीचंद पी हिंदुजा यांचं निधन झालं आहे. लंडनच्या एका रूग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८५ वर्षांचे होते. गोपीचंद यांनी जवळपास ६ दशकं त्यांचा कौटुंबिक व्यवसाय ग्लोबल पातळीवर नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली. २९ जानेवारी १९४० साली त्यांचा जन्म झाला होता. गोपीचंद यांचं निधन हे हिंदूजा समूहासाठी एका युगाचा अंत मानला जातोय.
हिंदुजा कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, गोपीचंद हिंदुजा यांना व्यापार क्षेत्रात ‘जीपी’ या नावाने ओळखलं जात होतं. ते काही आठवड्यांपासून लंडनमधील रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, पुत्र संजय आणि धीरज तसंच कन्या रीता असा परिवार आहे.
गोपीचंद हिंदुजा यांचा जन्म सिंधी व्यापारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबामध्ये झाला. त्यांनी मुंबईतील जे हिंद कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं. सुरुवातीपासूनच कुटुंबाच्या व्यवसायात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे हिंदुजा ग्रुपने ट्रेडिंग-केंद्रित व्यवसायातून बाहेर पडत ऑटोमोबाईल, ऊर्जा, मीडिया, बँकिंग आणि स्टीलसारख्या विविध क्षेत्रांत विस्तार केला.
गोपीचंद हिंदुजा यांनी आपल्या मोठ्या भावासोबत म्हणजेच श्रीचंद हिंदुजा यांच्यासोबत मिळून ग्रुपला नव्या उंचीवर नेलं. 1984 मध्ये Gulf Oil International आणि 1987 मध्ये भारतातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी अशोक लेलँडचे अधिग्रहण हे त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. या निर्णयांनी हिंदुजा ग्रुपला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली.
2023 मध्ये श्रीचंद हिंदुजा यांचे निधन झाल्यानंतर गोपीचंद हिंदुजा यांनी हिंदुजा ग्रुपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. हिंदुजा कुटुंब अनेक वेळा ब्रिटनच्या ‘संडे टाइम्स रिच लिस्ट’मध्ये सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समाविष्ट झाले आहे. 2024 मध्ये गोपीचंद हिंदुजा यांची एकूण संपत्ती सुमारे £37.2 अब्ज ब्रिटिश पाउंड इतकी होती.
गोपीचंद हिंदुजा लंडनमध्ये स्थायिक होते आणि ग्रुपच्या जागतिक व्यवसायाची देखरेख करत होते. त्यांचे छोटे बंधू प्रकाश हिंदुजा मोनाकोमध्ये राहतात. तर सर्वात छोटे बंधू अशोक हिंदुजा मुंबईतून भारतातील व्यवसाय सांभाळतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.