गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अवघ्या एका महिन्यात सोन्याचे दर सुमारे २२ हजार रुपयांनी कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ज्यांना दागिने घ्यायचे आहेत किंवा सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम होत असतो. अमेरिकेतील महागाई, फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबतची अनिश्चितता, डॉलरची मजबुती आणि अमेरिकेतील सरकारी रोख्यांवरील वाढते उत्पन्न यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. याशिवाय, यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने अनेक गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी सोने विक्री केले. त्यामुळेही सोन्याच्या किमतीत घसरण झाली. भारतीय रुपयाची तुलनेने झालेली मजबुती यामुळे देशांतर्गत सोन्याच्या दरात आणखी घट दिसून आली.
SAHI चे संशोधन प्रमुख गौरव अरोरा यांच्या मते, MCX वर सोन्यासाठी १ लाख १७ हजार ९०० रुपये प्रति १० ग्रॅम हा महत्त्वाचा आधार स्तर आहे. सध्याच्या परिस्थितीत सोन्याचा दर एक लाख रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांचे मत आहे.त्यामुळे लग्नासाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी सोने खरेदी करणाऱ्यांना सध्याची घसरण ही संधी ठरू शकते. मात्र, एकाच वेळी संपूर्ण सोने खरेदी करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करणे अधिक योग्य ठरेल, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
सोन्याच्या किमतीत पुढील काळातही चढ-उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर आणखी कमी होतील या अपेक्षेने खरेदी पूर्णपणे पुढे ढकलणे योग्य ठरणार नाही. काही तज्ज्ञांच्या मते, २०२७ मध्ये सोन्याच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यताही आहे.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दोन ते तीन टप्प्यांत खरेदी केल्यास दरातील चढ-उतारांचा धोका काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो. तसेच, सध्या सोन्याच्या वायदे बाजारात मोठी जोखीम घेणे टाळावे. सोन्याच्या दरातील सुमारे २२ हजार रुपयांची घसरण ही ग्राहकांसाठी दिलासादायक असली, तरी भविष्यात दर नेमके कोणत्या दिशेने जातील, हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे घाई न करता आणि संपूर्ण रक्कम एकाच वेळी न गुंतवता विचारपूर्वक सोने खरेदी करणे महत्त्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.