

Zero Depreciation Car Insurance explained : कारचा इन्शुरन्स संपला किंवा तो संपायच्या चार-पाच दिवस आधी आपण घाई-घाई करतो. तो इन्शुरन्स घेताना साधारणतः थर्ड पार्टी कव्हर, आपल्या कारचा विमा आणि वेळेवर पॉलिसी रिन्यू करण्यावर आपला भर असतो. पण ज्यावेळी अपघात घडतो आणि त्यानंतर आपण क्लेम करतो. तेव्हाच खरा अडथळा निर्माण होतो. एक छोटीशी चूक केल्यानं क्लेम रद्द होऊ शकतो.
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर होणं, पॉलिसीत चुकीची माहिती देणं, कारचे जुने डेंट्स किंवा स्क्रॅच हे नवीन अपघाताचं नुकसान असल्याचं सांगणं आणि लहान-सहान दुरुस्तीसाठी क्लेम करणं नुकसानदायी ठरू शकतं. अशा वेळी पॉलिसी खरेदी करण्यापासून ते अपघात आणि क्लेमपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्यामुळं पैसा आणि वेळ अशा दोन्ही त्रासापासून सुटका होईल.
अपघातानंतर फोटो आणि व्हिडिओ काढा
कारचा अपघात झाला तर घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडिओ काढून घ्या. कारला कोणत्या ठिकाणी आणि कशा प्रकारे नुकसान झाले आहे, याचे व्हिज्युअल पुरवा. कारण क्लेमच्या वेळी खूप उपयोगी पडू शकतं.
इन्शुरन्स घेताना योग्य माहिती द्या
पॉलिसी खरेदी करताना पूर्वीचे क्लेम, नो-क्लेम बोनस (NCB), कारचा मालक, कारचा वापर आणि त्यात केलेल्या मॉडिफिकेशनची योग्य माहिती द्या. चुकीची किंवा अपूर्ण माहिती नंतर क्लेम फेटाळून लावण्याचं कारण ठरू शकतं. कारचा मालक बदलल्यास, वैयक्तिक वापराऐवजी व्यावसायिक वापर सुरू केल्यास किंवा मोठे मॉडिफिकेशन केल्यास विमा कंपनीला त्याची माहिती दिली पाहिजे.
झिरो-डेपचा (Zero-Dep) पूर्ण अर्थ माहिती करून घ्या
झिरो डेप्रिसिएशन ॲड-ऑनमुळे अपघातानंतर काही पार्ट्सवर डेप्रिसिएशनची कपात होण्यापासून दिलासा मिळतो. विअर आणि टीअर यात समाविष्ट नसतो. इंजिन ऑइल, कुलंट, ब्रेक ऑइल, ग्रीस, लुब्रिकंट्स, नटबोल्ट यांसारख्या कन्झ्युमेबल्ससाठी वेगळ्या ॲड-ऑनची गरज पडू शकते. इंजिन आणि टायर प्रोटेक्शन हे देखील वेगळे कव्हर असू शकते.
प्रत्येक किरकोळ दुरुस्तीवर क्लेम नको
अगदी किरकोळ कामाकरिता क्लेम केल्यानं तुमचा NCB संपुष्टात येऊ शकतो. म्हणजे ८ ते १० हजार रुपयांची दुरुस्ती स्वतः करून घेतल्यानं NCB चा १२-१५ हजार रुपये बचत होत असली तर त्यापेक्षा स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करणे अधिक फायद्याचं ठरू शकतं. पण ५० हजार रुपये खर्च येऊ शकतो अशी मोठी दुरुस्ती असेल, तर क्लेम करणं अधिक फायद्याचे ठरते.
जुने डेंट नवीन अपघाताशी जोडू नका
आधीपासूनच असलेले किरकोळ डेंट किंवा काही नुकसान झालं असल्यास ते आताच्या अपघातामुळं झाले असल्याचं सांगून क्लेम करू नका. कारण त्यामुळं फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल. सर्व्हेअर असतात ते जुन्या आणि नवीन डेंटमधील फरक सहज ओळखू शकतात. असं केलं तर संपूर्ण क्लेमवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं.
पॉलिसी ट्रान्सफर करून घ्या
सेकंड हँड म्हणजे जुनी कार खरेदी केल्यानंतर फक्त वाहन स्वतःच्या नावावर करणे पुरेसे नाही. थर्ड पार्टी इन्शुरन्स ट्रान्सफर होऊ शकतो. पण ओन-डॅमेज (Own-Damage) कव्हर देखील नवीन मालकाच्या नावावर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. यासाठी विमा कंपनीकडून प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
कार चोरीला गेल्यास काय कराल?
कार चोरीला गेली तर सर्वात आधी एफआयआर नोंदवा. यासोबतच विमा कंपनी आणि आरटीओला (RTO) देखील माहिती द्या. सर्व आवश्यक कागदपत्रे, पोचपावती (acknowledgement), मूळ आरसी (Original RC) आणि कारच्या चाव्या सांभाळून ठेवा. माहिती देण्यास उशीर झाल्यास क्लेमची प्रक्रिया कठीण होऊ शकते.
टोटल लॉसचा अर्थ समजून घ्या
जर कार 'टोटल लॉस' घोषित केली, तर खराब झालेल्या कारची म्हणजेच स्क्रॅपची देखील काही किंमत असते. विमा कंपनीच्या प्रक्रियेनुसार ग्राहक याच्या विल्हेवाटीत मदत घेऊ शकतो किंवा स्वतः 'सॅल्वेज डिस्पोजल'ची जबाबदारी घेऊ शकतो.
थर्ड पार्टी इन्शुरन्स आणि पीए कव्हर
थर्ड पार्टी इन्शुरन्स तुमच्या कारमुळे दुसऱ्या कोणत्याही व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेला झालेल्या नुकसानाची कायदेशीर जबाबदारी कव्हर करतो. तर ओन-डॅमेज कव्हर तुमच्या स्वतःच्या कारला झालेल्या नुकसानासाठी असतं. दुसरीकडे, पर्सनल ॲक्सिडेंट (PA) कव्हर कारऐवजी मालक-चालकाला रस्ते अपघातात मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास आर्थिक सुरक्षा देतं.
रिन्यूअल करण्यापूर्वी पॉलिसीतील अटी जाणून घ्या
पॉलिसी रिन्यू करण्यापूर्वी केवळ प्रीमियम आणि कव्हरेज पाहून निर्णय घेऊ नका. कोणते नुकसान कव्हर केलेलं नाही, कोणते ॲड-ऑन समाविष्ट आहेत, क्लेमसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि कोणत्या परिस्थितीत क्लेममध्ये कपात किंवा अडचण येऊ शकते, हे नक्की जाणून घ्या. अपघाताच्या वेळी अचानक होणारा खर्च आणि वाद टाळण्यास मदत होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.