Maharashtra Rain Live Updates: पुण्यात जोरदार पाऊस; खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Maharashtra Rain Live Updates and News (25 July 2023): पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पुढील 5 दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
pune rain
pune rain Saam tv
Published On: 

पुण्यात जोरदार पाऊस; खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

पुण्यातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस बरसत आहे. जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून 421 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर असल्यानं पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्यानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Kolhapur Rain: कोल्हापुरातील राधानगरी धरण भरलं, पाणी सोडण्याची शक्यता असल्यानं अनेक गावांना पुराचा धोका

कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये गेल्या १२ दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे राधानगरी धरण ९६ टक्के भरलेला आहे. या धरणाच्या ७ स्वयंचलित दरवाजापर्यंत धरणातील पाणी पोहोचलेला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी हे स्वयंचलित दरवाजे उघडून भोगावती नदीत पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसणार आहे.

कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पन्हाळा तालुक्यातील धारवाडीत डोंगराला भेगा

कोल्हापुरात पुराची भीती; २८ भागांतील शाळांना उद्यापासून सुट्टी

कोल्हापूर जिल्ह्यातील 28 पूरप्रवण क्षेत्रातील शाळांना उद्यापासून सुट्टी

कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासनाने घेतला निर्णय

या शाळेचा उपयोग निवारा केंद्रासाठी करण्यात येणार

Raigad Rain : रायगडमधील महाडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती; सावित्री, काळ, गांधारी नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

सावित्री, काळ आणि गांधारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

महाड शहरातील क्रांतीस्तंभ, दस्तुरी नाका रायगड रोड परीसरात गांधारी नदीच्या पुराचे पाणी

रस्त्यावर बिरवाडीमधील सखल भागात काळ नदीचे पाणी रस्त्यावर

सायरन वाजवून महाड नगरपालिकेने दिला धोक्याचा इशारा

प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Chiplun Rain: चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गेल्या आठवडाभरापासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. चिपळूणमध्ये मंगळवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे.

वाशिष्ठ नदीची पाणीपातळी वाढली असून, नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नदीने अद्याप इशारा पातळी ओलांडली नसली, तरी काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे.

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलावर खड्यांचं साम्राज्य

सायन पनवेल महामार्गावरील बेलापूर खिंडीजवळ असलेल्या उड्डाणपुलावर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले आहेत.

या खड्ड्यामधून वाट काढताना वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील होत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हलक्या वाहनांनी पाम बीच मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आलं आहे.

दरम्यान, महापालिकेकडून भर पावसात खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. पावसामुळे खड्डे बुजवण्यात मोठी अडचणी येत आहेत.

सावधान! खडकवासला धरणातून पाणी सोडले जाणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

खडकवासला धरण परिसरात संततधार होणाऱ्या पावसामुळे धरण १०० टक्के म्हणजे पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. आज संध्याकाळी ५.०० वाजता खडकवासला धरणातून १ हजार क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे.

नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये. नदीपात्रात तत्सम साहित्य किंवा जनावरे असल्यास असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे. सखल भागातील नागरिकांना सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले महत्वाचे आदेश

मागील आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धो-धो पाऊस कोसळत आहे. पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच कोल्हापूरकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

आता पंचगंगा नदी धोका पातळीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान,पुरात राजाराम बंधाऱ्याजवळ २०१९ आणि २०२१ मध्ये ज्यावेळी पंचगंगा नदीची पाणी पातळी ५२ फूट झाली होती.

त्यावेळी कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील ज्या-ज्या कुटुंबांना स्थलांतरित व्हावं लागलं होतं, त्या सर्व कुटुंबांनी आज २५ जुलै २०२३ रोजी सायंकाळपर्यंत सर्व साहित्यांसह स्थलांतरित होण्यासाठी तयार रहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या सूचना मिळताच या सर्वांचे निवारागृहात किंवा शिबिरामध्ये स्थलांतर केलं जाणार आहे. त्यामुळं स्थलांतरित होण्यासाठी आजच सर्व तयारी करून ठेवावी, असंही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितलंय.

पश्चिम विदर्भाला पावसाचा जोरदार फटका, चार दिवसांत २९ जणांचा मृत्यू

पश्चिम विदर्भात १८ जुलै ते २२जुलै या चार दिवसात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाने कहर केला आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्याचा प्राथमिक अहवाल जाहीर केला आहे. यात ४ दिवसात वीज पडून, पुरात वाहून गेल्याने आणि भिंत कोसळण्याच्या घटनेत तब्बल २९ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय ३ लाख ४८८७.८५ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. १० हजार ३८० घरांची पडझड झाली असून पुरात अडकलेल्या १६५८ कुटुंबातील ५१५६ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

धक्कादायक म्हणजे १ लाख ७१ हजार २८ हेक्टर शेत जमीन पूर्णपणे खरडून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवले आहे. हा प्राथमिक अहवाल असून यात शेतकरी पार खचल्याचे चित्र आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकाराने विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत आहे.

नांदेड : भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी भर पावसात नागरिकांचे उपोषण

नांदेडच्या बळीरामपूर ग्रामपंचायतीमध्ये अनेक कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी जिल्हापरिषद कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी या उपोषणकर्त्यानी केलीय.भर पावसात या उपोषणकर्त्यानी उपोषण सुरूच ठेवले आहे.परंतु या उपोषणाची दखल घेण्यात आली नाहीय.

धाराशिव जिल्ह्यात पावसाची संततधार

धाराशिव जिल्ह्यात पाऊस संततधार पाऊस सुरू आहे. काल रात्रीपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळतोय. खरिपाच्या पेरण्या पूर्ण होत आल्या तरीही अद्याप जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पीक ही संकटात आली आहेत. धाराशिवसह, कळंब वाशी, तुळजापूर, भूम तालुक्यांमध्ये हा पाऊस झालाय. मात्र धाराशिव जिल्ह्याला मोठ्या पावसाची अपेक्षा अजूनही कायम आहे.

ठाण्यात सकाळपासून पावसाची रिप रिप सुरू

ठाण्यात आज सकाळी पासून पावसाची रिप रिप सुरूच आहे.त्यातच माजिवडा उड्डाण पुलावर कंटेनर चालकाचा ताबा सुटल्यामुळे नाशिक हून मुंबईचा दिशेने जाणाऱ्या वाहनातून रस्त्यावर ऑईल पडले होते खाद्य तेलाचे ड्रम घेवून जाणाऱ्या या कंटेनर मधून ऑईल रस्त्यावर सांडले होते सदरचे ऑईल सांडलेल्या ठिकाणी पाणी मारून रस्ता मोकळा करण्यात आला आहे.सदरची घटना पहाटेची आहे.

Sangli Rain: सांगलीकरांसाठी मोठी अपडेट; वारणा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ, सतर्कतेचा इशारा

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संथतदार सुरू असून चांदोलीत अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासात चांदोलीत 76 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे.

त्यामुळे अनेक ठिकाणी वारणा काठची पिके पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर आणखी वाढल्यास आणि धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून केव्हाही पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे वारणाकाठी सावधानतेचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

तर वारणा नदी पात्राच्या बाहेर पडल्याने शेतामध्ये पाणी शिरलेला आहे.. तसेच नदीला पाणी वाढल्यामुळे शिराळा तालुक्यातील कोकरूड रेठरे, मांगले सावर्डे, शिराळे खुर्द माणगाव हे तीन बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.

Maharashtra Rain Live Updates: पश्चिम विदर्भात पावसाचा हाहाकार, शेतीपिकांचं मोठं नुकसान; ४ दिवसांत २९ जणांचा मृत्यू

पश्चिम विदर्भात १८जुलै ते २२ जुलै या ४ दिवसात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्याचा प्राथमिक अहवाल जाहीर केला आहे. या ४ दिवसात वीज पडून, पुरात वाहून व भिंत कोसळून अशा विविध घटनांमध्ये २९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय ३ लाख ४८८७.८५ हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाले आहेत. तर १०,३८० घरांची पडझड झाली आहे. पुरात अडकलेल्या १६५८ कुटुंबातील ५१५६ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे १ लाख ७१ हजार २८ हेक्टर शेत जमीन पूर्णपणे खरडून निघाली आहे.

दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे, हा प्राथमिक अहवाल आहे.या घटनांमुळे शेतकरी पार खचला असून राज्यात सर्वाधिक आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भ आहेत. त्यामुळे विशेष पॅकेज या पश्चिम विदर्भासाठी जाहीर करण्यात यावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Maharashtra Rain Live Updates: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबई, पुण्यासह ७ जिल्ह्यांमध्ये धो-धो पाऊस बरसणार

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना देखील घडत आहेत. अशातच आता पुढील आणखी ४ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पुढील 5 दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय आज मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com