भिवंडीत पावसाचा जोर वाढला. शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. बाजार पेठ, शिवाजी चौक,
नझराना कंपाउंड या परिसरात 4 ते 5 फूट पाणी साचले आहे. शेकडो दुकानांमध्ये पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे.
मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे मुंबईत अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. जोगेश्वरी ते मालाड दरम्यान सध्या वाहतूककोंडी झाली आहे.
कल्याण, डोंबिवली, ठाण्यात पावसाचा जोर वाढला आहे. कल्याण रेल्वे स्थानकात पावसाचं पाणी साचल्यानं रूळ पाण्याखाली गेले आहेत. परिणामी लोकल वाहतूक पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहे.
ठाण्यात संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा, आनंद नगर, ओवळा या ठिकाणी पावसाचे पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळे पाणी साचलं आहे. मागील आठ तासांत 88 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मागील तासाभरात 25 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरातील पाचपाखाडी भागात एका सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली.
आज सकाळपासूनच कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती; मात्र दुपारनंतर पावसाने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरलाय. तासाभरापासून कोसळणाऱ्या पावसामुळे कल्याण पश्चिमेकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना, नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागतेय.. पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरातील इतर सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.
अमरावतीच्या अनेक भागांत ९ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू
जिल्ह्यतील विरुळ रोघे गावात शिरले पुराचे पाणी
विरूळ गावातील मुख्य रस्ते जलमय
ग्रामपंचायत परिसर जलमय
गावातील मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप
वसई-विरारमध्ये आज रेड अलर्ट जारी केला आहे. सकाळी ११ वाजल्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क, गालानगर, तुळज रोड, एसटी डेपो निळेगाव या भागात गुडघाभर पाणी साचले आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास पुन्हा एकदा वसई-विरारमध्ये पूर होण्याची शक्यता आहे. नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा गावात गुडघाभर पाणी साचले असून गेल्या अनेक दिवसांपासून लोकांची या पाण्यातून सुटका होत नाहीये. या परिसरातील खड्ड्यांमध्ये माती भराव केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
Mumbai Rain : मुंबई आणि उपनगरांत सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले आहे. मरीन लाइन्स रेल्वे स्थानक परिसर देखील जलमय झाला आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. नागरिकांना चालताना कसरत करावी लागत आहे.
मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस
चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर सखल भागात साचले पाणी
रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी
महापालिकेकडून पाणी उपसायला सुरुवात
मुंबईसाठी पावसाचा रेड अर्लट, अतिमुसळधार पावसाचा अंदाज
यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहरातील बांगर नगर परिसरातील नाल्यात एक महिला वाहून गेली.
नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू आहे.
निकृष्ट कामामुळे कळवंडे धरणाला निर्माण झाला धोका
जलसंपदा विभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना
मुसळधार पावसामुळे धरणाच्या खालील बाजूस असणाऱ्या गावांना निर्माण होऊ शकतो धोका
पावसाचा जोर कायम असल्याने धरणात पाणीसाठा वाढू लागल्यास धोकाही वाढणार
खडकवासला धरण परिसरात पडणाऱ्या पावसामुळे धरण ९७ टक्के भरले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ होत असून आज संध्याकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान खडकवासला धरणातून ८५६ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. वाहने नदीपात्रात लावू नयेत. सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
इटियाडोह धरणात ६७.५५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातील पाण्याचा गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांना लाभ होणार आहे. धरणातून 18 हजार हेक्टर शेतीला पाणी मिळेल.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज डायलिसिस सेंटरच्या (सायन पूर्व) आवारात पावसाचे पाणी शिरले. सेंटरमधील काही उपकरणे व फर्निचर खराब झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात मागील पाच दिवसांपूर्वी धो-धो पाऊस बसरल्यानंतर संपूर्ण जिल्हा जलमय झाला होता. दरम्यान आज, गुरुवारी सकाळपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे यवतमाळ शहर, राळेगांव, कळंब आर्णीसह इतर तालुक्यांना तडाखा बसला आहे. काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झालीय. अनेक घरांत पाणी शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम असून गेल्या 24 तासांमध्ये या ठिकाणी पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. 55 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद धरण क्षेत्रामध्ये झाली आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे चांदोली धरण आता जवळपास 85% इतकं भरले आहे आणि धरणामध्ये पाण्याची आवक ही कायम आहे.
34.40 टीएमसी इतकी साठवण क्षमता असणाऱ्या धरणामध्ये आता 29 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे धरण प्रशासनाकडून धरणातून वारणा नदी पात्रामध्ये विसर्ग कालपासून सुरू करण्यात आला होता.
विसर्ग आता वाढवून 6 हजार 780 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होणारा असून धरण प्रशासनाकडून वारणा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
उरण शहरालगत असलेल्या द्रोणागिरी डोंगरावर देखील भूस्खलनाचा धोका निर्माण झालाय. द्रोणागिरी डोंगरावरील माती खचत असून खाली कोसळत आहे. डोंगराच्या काही अंतरावर ओएनजीसी कंपनी तसेच काही रहिवासी इमारतीत देखील आहेत. स्थानिक प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून डोंगराजवळ जाण्यास मज्जाव करण्यात आलाय.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी सुरू आहे. गेल्या 24 तासात तब्बल 144 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलीये. रत्नागिरी तालुक्यात तब्बल 177 लांजा तालुक्यात 169 संगमेश्वर 157 मंडणगड तर गुहागर 143 मिलीमीटर पाऊसाची नोंद झालीये. जूनपासून आतापर्यंत 1980 मिलिमीटर सरासरी पाऊस जिल्ह्यात बरसला आहे. गतवर्षाची पावसाची सरासरी देखील ओलांडली गेलीये.
रत्नागिरी : गेल्या ५ ते ६ दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीला पूर आला आहे. पूराचे पाणी चांदेराई बाजारपेठेत शिरल्याने संपूर्ण बाजारपेठेत ४ ते ५ फुटांपर्यंत पाणी साचलं आहे.
तब्बल १३ तासांपासून चांदेराई 13 तास चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली असून ६८ दुकानांमध्ये पाणी साचल्याची माहिती आहे. दरम्यान, नदीला आलेल्या पुरामुळे देवधे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आहे.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान येथील गारबट वाडीला दरडीचा धोका निर्माण झाला आहे. गेली आठ ते दहा दिवस सुरु असलेल्या जोरदार पावसा दरम्यान माथेरानच्या डोंगर पायथ्याशी असलेल्या गारबट वाडी भोवती शेतामध्ये मोठमोठे चर व खड्डे पडल्याचे समोर आले आहे.
डोंगरावरील जमिन भेगाळल्याने गारबाट वाडीला दरडीचा धोका निर्माण झाला आहे. पारंपारीक दुग्ध व्यवसाय असल्याने येथील ग्रामस्थांकडे मोठ्या प्रमाणात गायी, म्हशी,मेंढ्या असल्यामुळे येथील ग्रामस्थ गाव सोडुन येण्यास नकार देत होते. मात्र बुधवारी प्रशासनाने ग्रामस्थांची समज काढत येथील ग्रामस्थांना माथेरान नगरपरीषदच्या कम्युनिटी सेंटर हॉल हलवले आहे. तर काहीजण आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेले आहेत.
गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशातच मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे.
महामार्गावरील निवळी घाटात दरड कोसळली असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून तातडीने दरड हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याची माहिती आहे.
नागपूरमध्ये गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरामध्ये १२ तासांत तब्बल १२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं असून नद्या-नाल्यांना पूर आला आहे. कादंबिनी विहार येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांनी रात्र जागून काढली. वस्तीत सध्या गुडघाभर पाणी आहे. तर नरेंद्र भगर रेल्वेपूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.