Crime Podcast: फॅमिली डॉक्टर बनला 'देवमाणूस'; राज्य हादरवणारा, मुख्यमंत्री ते राष्ट्रपतींपर्यत पोहचलेला खून खटला

Family Doctor Turned Murderer: महाराष्ट्रात एक खून खटला गाजला, लक्ष्मीबाई कर्वे खून खटला. हाच खटला डॉ. अनंत चिंतापण लागू खटला म्हणूनही ओळखला गेला.
Crime news
Crime news Saam TV

Crime Unplugged | Marathi Crime Podcast: फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आजच्या काळात फारशी दिसत नाही. पण पूर्वी फॅमिली डॉक्टर आणि कुटुंबांचं एक वेगळंच नातं तयार व्हायचं. पेशंटच्या कुटुंबातल्या अगदी खासगी गोष्टीही फॅमिली डॉक्टरला माहित असायच्या. अशाच एका फॅमिली डॉक्टरचा डोळा पेशंटच्या इस्टेटीवर आणि पैशांवर गेलं आणि घडलं एक गाजलेलं प्रकरण.

गुन्हेगारी आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही. हे विधान कदाचित धक्का देणारं असेल, पण ते सत्य आहे. जगभरात अनेक गुन्हे हे उच्चशिक्षितांनी केल्याचे दाखले इतिहासात आहेत. असाच एका खटल्याचा धांदोळा आपण आज घेणार आहोत. (Crime News)

१९५० चे दशक... याच काळात महाराष्ट्रात एक खून खटला गाजला, लक्ष्मीबाई कर्वे खून खटला. हाच खटला डॉ. अनंत चिंतापण लागू खटला म्हणूनही ओळखला गेला. आज हा खटला विस्मृतीत गेलाय. हे सगळंच प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं. मानवी स्वभावाचे डॉ. जेकिल आणि मिस्टर हाईड या वृत्ती दाखवणारं.

त्यावेळी दूरचित्रवाणी वाहिन्या नव्हत्या म्हणून बरं, नाहीतर या वाहिन्यांची या केसचा किस पाडून काव आणला असता. 'लक्ष्मीबाई कर्वे खून प्रकरणात डॉ. अनंत चिंतामण लागू यांना फाशीची शिक्षा' अशी हेडलाईन (तारीख) 'सकाळ'मध्ये झळकली. काय होतं हे प्रकरण?

या प्रकरणाच्या खोलात शिरण्यापूर्वी आपण जाणून घेऊ या लक्ष्मीबाई कर्वे कोण ते? लक्ष्मीबाईंचं माहेरचं नाव इंदूमती पोंक्षे. १९२२ साली त्यांचं लग्न पुण्यातले एक सधन गृहस्थ अनंत कर्वे यांच्याशी झाला. कर्वे विधूर होते. त्यांना विष्णू नावाचा एक मुलगा होता. लक्ष्मीबाईंना अनंत कर्वे यांच्यापासून रामचंद्र आणि पुरुषोत्तम उर्फ अरविंद ही दोन मुलं झाली. अनंत कर्वे १९४५ मध्ये वारले. १९५४ मध्ये लक्ष्मीबाईंचा मुलगा पुरुषोत्तमचंही निधन झालं. (Saam TV Podcast)

अनंत कर्वेंचा पुण्यात शुक्रवार पेठेत वाडा होता. कर्वेंनी मृत्यूपत्र लिहिलं होतं. त्यात शुक्रवार पेठेतलं राहतं घर त्यांनी रामचंद्रला दिलं होतं. मात्र त्या घरातल्या तीन खोल्यांवर लक्ष्मीबाईंचा हक्क ठेवला होता. त्याशिवाय लक्ष्मीबाईंना वाड्यातल्या भाडेकरूंकडून दरमहा काही पैसे मिळण्याचीही व्यवस्था केली होती.

त्यांनी आपल्या ५ हजार रुपयांच्या विमा पॉलिसीचा वारस म्हणून लक्ष्मीबाईंचं नाव दिलं होतं. त्याशिवाय ६० तोळे सोनं आणि आणखी काही दागिनेही लक्ष्मीबाईंसाठी ठेवले होते. या व्यतिरिक्त लक्ष्मीबाईंना आपल्या आईच्या निधनानंतर तिनं गुंतवलेले २५ हजार रुपयांचे शेअर आणि ६० तोळे सोनं मिळालं होतं.

पुरुषोत्तमच्या नावावर त्यांनी बँक आणि पोस्टातल्या ठेवी केल्या होत्या. १९५४ मध्ये पुरुषोत्तमचा मृत्यू झाल्यानंतर लक्ष्मीबाईंना त्याही मिळाल्या.......थोडक्यात लक्ष्मीबाई चांगल्याच श्रीमंत होत्या.....मात्र, काही दिवसांतच लक्ष्मीबाई आणि त्यांचा मुलगा रामचंद्र यांच्यात संपत्तीवरुन वाद सुरु झाले. रामचंद्र लष्करात भरती झाला. वाद असूनही दोघांमधला पत्रव्यवहार सुरु होता. काही महिन्यांनी लक्ष्मीबाईंनी रामचंद्रचं लग्नही लावून दिलं.

Crime news
Crime Podcast: महाराष्ट्राला हादरवणारं परभणीचं 'मानवत हत्याकांड'; मांत्रिकाचा एक सल्ला अन् 11 निष्पाप जीवांचा क्रूर अंत

याच सुमारास लक्ष्मीबाईंना डायबेटिससारखे काही आजार झाले. एक-दोन लहान मोठ्या शस्त्रक्रीयाही कराव्या लागल्या. त्यांच्यावर उपचार करत होते कर्वे कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर अनंत चिंतामण लागू, त्यांचे भाऊ बी. सी. लागू हे देखील डॉक्टर होते. त्यांचाही कर्वे कुटुंबाबरोबर घरोबा होता.

या उपचारांच्या दरम्यान डॉ. अनंत लागू कर्वे यांच्याच घरी रहायला लागले. लक्ष्मीबाईंनी त्यांना एक खोली वापरायला दिली. बहुदा यावरुनच रामचंद्र आणि लक्ष्मीबाईंचे वाद झाले असावेत. लक्ष्मीबाईंचा पूर्ण विश्वास डॉ. लागूंवर होता. त्यामुळे लक्ष्मीबाईंचे बँकेचे व्यवहारही तेच करायचे. आपली तब्येत पाहता पुढं मागं आपल्या इस्टेटीचा ट्रस्ट करण्याचं लक्ष्मीबाईंच्या मनात घाटत होतं.

लक्ष्मीबाईंच्या आजारपणावर उपचार सुरु असताना डॉ. लागूंनी मुंबईच्या एका डॉ.साठेंची अपॉईंटमेंट त्यांच्यासाठी घेतली. ही अपॉईंटमेंट होती १३ नोव्हेंबर १९५६ रोजीची दुपारी साडेतीन वाजताची. १२ नोव्हेंबरच्या रात्री लक्ष्मीबाई मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाल्या. डॉ. लागूही त्यांच्याबरोबर होते. मात्र त्यानंतर लक्ष्मीबाई कधी घरी परतल्याच नाहीत. नक्की काय घडलं त्यांच्याबाबत? (Latest Breaking News)

काही दिवसांनी लक्ष्मीबाईंनी लिहिलेली काही पत्र त्यांच्या नातेवाईकांना-आप्तेष्टांना यायला सुरुवात झाली. मी तीर्थयात्रेला गेलीये. मला शोधू नका अशा मजकुराची काही पत्र पुण्यातल्या अनेक नातेवाईकांच्या पत्त्यावर आली होती. काही दिवसांनी आणखी एक पत्र एका नातेवाईकांना मिळालं. मी जोशी नावाच्या एका इसमाशी लग्न केलं असून सध्या मी जयपूर जवळच्या एका गावात त्यांच्याबरोबर सुखानं संसार करतेय. असं या पत्रात लिहिलं होतं.

एव्हाना काही नातेवाईकांना संशय यायला लागला होता. त्यामुळं लक्ष्मीबाई शुक्रवार पेठेतल्या ज्या घरात रहायच्या तिथल्या त्यांच्या खोलीचं कुलूप नातेवाईकांनी फोडलं. पूर्ण खोली रिकामी होती. सर्व चीजवस्तू गायब होत्या. त्यानंतर त्यांच्या एका नातेवाईकाला आणखी एक पत्र मिळालं. मीच या वस्तू हलवल्या आहेत. त्याबद्दल कुणाला जबाबदार धरू नका, असं या पत्रात लिहिलं होतं.

अखेर लक्ष्मीबाईंचे भाऊ जी. डी. भावे यांनी पुढचं पाऊल उचललं. लक्ष्मीबाई मुंबईला गेल्याच्या दिवसापासून सुमारे तेरा महिन्यांनी ३१ डिसेंबर १९५७ रोजी त्यांनी तत्कालीन मुंबई प्रांताच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशीही पत्रव्यवहार केला. लक्ष्मीबाईंच्या डॉ. दातार नावाच्या एका परिचितानंही असाच पत्रव्यवहार केला. लक्ष्मीबाईंचा मुलगा रामचंद्रनंही पोलिसांकडं तक्रार केली. या सर्वांनीच डॉ. लागूंवर संशय व्यक्त केला होता.

Crime news
Assam Crime News: आसाम हादरले! Instagram वरची मैत्री पडली महागात, धावत्या कारमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार

अखेर पोलिसांनी १२ मार्च १९५८ रोजी पुणे पोलिसांनी डॉ. लागूंना अटक केली. त्यानंतर जे काही बाहेर आलं ते सगळंच भयानक होतं.

१२ नोव्हेंबर १९५६ ला डॉ. लागू लक्ष्मीबाईंबरोबर मुंबईला गेले. त्यापूर्वी ८ नोव्हेंबरला लक्ष्मीबाई जी. डी. भावेंना भेटल्या होत्या. मी १२ तारखेला डॉ. लागूंबरोबर मुंबईला जातेय असं त्यांनी भावेंना सांगितलं होतं. आणखी एक दोघांनाही त्यांनी हेच सांगितलं होतं. लक्ष्मीबाईंच्या दिवंगत पतीनं त्यांना भाडेवसुलीचा अधिकार दिला होता. लक्ष्मीबाईंच्या वाड्यात एक वीरकर नावाचा भाडेकरु होता. मुंबईला निघण्यापूर्वी काही वेळ आधी लक्ष्मीबाईंनी त्याच्याकडून ५० रुपये घरभाडं वसूल केलं होतं. मुंबईला जाण्यापूर्वी लक्ष्मीबाईंची तब्येत उत्तम होती हे या सर्वांनी पाहिलं होतं.

लक्ष्मीबाई आपलं बेडिंग आणि इतर सामान घेऊन घराखाली उतरल्या तेव्हा त्यांच्या एका परिचितानं त्यांना आणि लागूला एकत्र पाहिलं होतं. त्यानंही लक्ष्मीबाईंची तब्येत उत्तम असल्याचा निर्वाळा नंतर दिला होता.

१२ नोव्हेंबरला लक्ष्मीबाई लागूबरोबर मुंबईकडं रवाना झाल्या. १३ नोव्हेंबरच्या पहाटे पॅसेंजर मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आजच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर साडेपाच वाजता पोहोचल्या. त्यावेळी लक्ष्मीबाई पूर्ण बेशुद्धावस्थेत होत्या. लागूनं त्यांना टॅक्सीकरुन जवळच असलेल्या जीटी हास्पिटलमध्ये दाखल केलं. त्याच दिवशी सकाळी साडेअकरा वाजता हॉस्पिटलमध्ये लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाला.

लागू लक्ष्मीबाईंचा मृतदेह तिथंच सोडून पुण्याला परतला. पुण्याला आल्यावर त्यानं लक्ष्मीबाईंच्या मृत्यूबाबत कुठलीही वाच्यता केली नाही. पुढच्या एक दोन दिवसांत त्यानं लक्ष्मीबाईंच्या सह्या असलेले चेक वटवून बँकेतून पैसे काढले. पुढच्या काळात त्यानं लक्ष्मीबाईंची बनावट पत्रं त्यांच्या नातेवाईकांना पाठवली

लागू खरोखरच चलाख गुन्हेगार होता. मुंबईत त्यानं लक्ष्मीबाईंना जीटी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं तेव्हा त्यानं त्यांचं खरं नाव न नोंदवता त्यांच्या माहेरचं इंदूमती पोंक्षे हे नाव तिथल्या रजिस्टरमध्ये नोंदवलं होतं. पत्ता मात्र स्वतःच्या दवाखान्याचा दिला होता. लक्ष्मीबाईंना फिट्स येतात आणि आता त्या डायबेटिक कोमामध्ये आहेत. हे त्यांनी तिथल्या डाॅक्टरांच्या मनावर ठसवलं होतं. साहजिकच लक्ष्मीबाईंवर त्या दुर्दैवी दिवशी उपचार झाले ते तोच आजार गृहित धरून.

Crime news
Gondia Crime News: बाप-लेकांनी केली युवकाची हत्या; शेतात गुरे चारण्यास नेल्‍याचा होता जुना वाद

लक्ष्मीबाईचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचं मत एका व्हिजिटिंग डॉक्टरनं नोंदवलं होतं. त्यामुळं वास्तविक लक्ष्मीबाईंचं पोस्टमार्टेम व्हायला हवं होतं. जीटी हॉस्पिटलच्या रजिस्टार डॉक्टरनं त्याच दिवशी दुपारी डॉ. लागूला पुण्यात तार केली होती आणि लक्ष्मीबाईंच्या मृत्यूबाबत कळवलं होतं.

लागूनं वेळ घालवण्यासाठी तारेला उत्तरच दिलं नाही. त्या ऐवजी त्यानं एक इनलँड लेटर जीटी हॉस्पिटलला पाठवलं. मी लक्ष्मीबाईंच्या मृत्यूबाबत कलकत्त्यात राहणाऱ्या त्यांच्या भावाला माहिती दिली आहे. दोन तीन दिवसांत तो येऊन मृतदेह ताब्यात घेईल, असं लागूनं त्या पत्रात लिहिलं होतं.

त्यावेळी ही थेट घातपाताची केस न वाटल्यानं लक्ष्मीबाईंच्या मृतदेहाच्या पोस्टमार्टेमला उशीर झाला. या पोस्टमार्टेममध्ये त्यांच्या शरीरात विषारी द्रव्य किंवा तसले काहीच सापडलं नव्हतं. लक्ष्मीबाईंच्या पोस्टमार्टेमनंतर मुंबई पोलिसांच्या माध्यमातून पुणे पोलिसांना कळवण्यात आलं. त्यात अर्थातच मृत महिलेचं नाव इंदूमती पोंक्षे असंच नोंदवण्यात आलं होतं. या इंदूमती पोंक्षेंना डॉ. अनंत चिंतामण लागू या डॉक्टरनं रुग्णालयात आणलं होतं अशी माहिती पुणे पोलिसांना देण्यात आली.

पुणे पोलिसांनी १६ नोव्हेंबरला डॉ. लागूचा जबाब नोंदवला. त्यावेळी आपण मुंबईला जात असताना एक महिला अचानक बेशुद्ध झाली आणि डॉक्टर या नात्यानं मी तिला रुग्णालयात दाखल केलं होतं अशी माहिती लागूनं पोलिसांना दिली.

ही इंदूमती पोंक्षे नावाची महिला प्रत्यक्षात लक्ष्मीबाई कर्वे आहे हे लक्षात यायला १२ मार्च १९५८ हा दिवस उजाडायला लागला. डॉ. लागूला पोलिसांनी अटक केल्यानंतर तो १२ नोव्हेंबरच्या दिवशी लक्ष्मीबाईंबरोबर मुंबईच्या प्रवासात सोबत होता हे उघड झालं. नंतर जीटी हॉस्पिटलमध्ये लक्ष्मीबाईंच्या नातेवाईकांनी त्यांचे कपडे आणि मृतदेहाचा फोटो या दोघांचीही ओळख पटवली.

अखेर पोलिसांनी लागूच्या विरोधात खून, घरफोडी, बनावट कागदपत्रं तयार करणं अशा विविध कलमांखाली एकूण आठ खटले नोंदवले. या सगळ्या काळात आपण लक्ष्मीबाईंना विष दिलंच नाही यावर लागू ठाम होता. मात्र मुंबईला निघण्यापूर्वी लागूनं लक्ष्मीबाईंना दोन इंजेक्शनं दिली होती असा जबाब लक्ष्मीबाईंच्या मोलकरणीनं नोंदवला होता.....

Crime news
Pune Fraud News: कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने तरुणींना घातला तब्बल ४४ लाखांचा गंडा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

लागूनं जे चेक बँकेत वठवले होते त्यावर लक्ष्मीबाईंच्या सह्या होत्या...त्या बनावट असल्याचं पोलिसांचे म्हणणं होतं. या चेकवरचा अन्य तपशील स्वतः लागूच्या हस्ताक्षरात होता. त्यामुळंच लागूनं पैशांच्या मोहापायी लक्ष्मीबाईंचा बळी घेतला या आरोपाला पुष्टी मिळत होती.

लक्ष्मीबाईंच्या मृत्यूनंतर येणारी सर्व पत्रं डॉ. लागूनंच पाठवल्याचंही सिद्ध झाले. ही सर्व पत्र त्यानं रेल्वे मेल सर्व्हिसच्या माध्यमातून पाठवली होती. त्यामुळं ही पत्र नक्की कुठल्या गावातून आली आहेत हे कळायला कुणालाच वाव नव्हता. लक्ष्मीबाईंचं नाव जीटी हॉस्पिटलमध्ये नोंदवताना त्यानं इंदूमती पोंक्षे हे नाव दिलं होतं. हा देखिल मुद्दा लागूच्या विरोधात होता. लक्ष्मीबाईंच्या त्या कथित पत्रांपैकी एकात आपण विवाह केल्याचा व जयपूर जवळच्या एका गावात रहात असल्याचा उल्लेख होता. प्रत्यक्षात त्या पत्रात लिहिलेल्या नावाचं गावंच अस्तित्वात नव्हतं.

त्यामुळे विष देऊन खून याच एका मुद्द्यावर सगळी केस चालली. पुण्याच्या सत्र न्यायालयानं १४ डिसेंबर १९५८ ला डॉ. अनंत चिंतामण लागू याला फाशीची शिक्षा सुनावली. अन्य गुन्ह्यांसाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

लागूनं शिक्षेच्या विरोधात अपिल केलं. लक्ष्मीबाईंच्या शरीरात प्रत्यक्ष विष सापडलं नसलं तरी पोस्टमार्टेमला झालेल्या विलंबामुळं विष सापडलं नसावं किंवा लागू स्वतः डाॅक्टर असल्यानं त्याला शरिरात सापडू न शकणाऱ्या विषाबाबतची माहिती असावी असा पुण्याच्या सत्र न्यायालयाचा निष्कर्ष होता. तो उच्च न्यायालयानंही मान्य केला आणि लागूची फाशी कायम केली.

पुढं लागूनं सर्वोच्च न्यायालायात अपिल केलं. सर्वोच्च न्यायालयानंही लागूची फाशीची शिक्षा कायम केली. मात्र लागूचं नशीब बलवत्तर होतं. त्यानं राष्ट्रपतींकडं दयेची याचना केली. ८ सप्टेंबर १९६० रोजी राष्ट्रपतींनी त्याचा दयेचा अर्ज मंजूर करत डॉ. अनंत चिंतापण लागूची फाशी जन्मठेपेत बदलली.

डॉ. अनंत चिंतामण या डॉक्टरची सगळी विद्वत्ता पैशांच्या मोहापायी वाया गेली. पूर्वी खुनाच्या गुन्ह्याचा सरसकट फाशी दिली जायची. पण नंतर काही वर्षांत केवळ दुर्मिळातल्या दुर्मिळ म्हणजेच रेअरेस्ट ऑफ रेअर केसेसमध्ये फाशी दिली जावी, असं सुप्रीम कोर्टानं एका निकालात नोंदवलं. लागूंनी केलेल्या खुनाचं प्रकरण आजच्या काळातही रेअरेस्ट ऑफ रेअरच ठरलं असतं नाही का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com