Muramba Serial: स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट येत असून प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत सात वर्षांचा लीप दाखवला गेला आहे. या लीपनंतर नायक-नायिका म्हणजेच अक्षय आणि रमा यांच्यातील नातं कसं बदलतं, याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता या दोघांची पहिली भेट दाखवणारा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चेत आहे.
प्रोमोमध्ये रमा एका कार्यक्रमाला जाते. तिथेच तिची मुलगी आरोही अचानक अक्षयसमोर येते आणि त्या निमित्ताने रमा आणि अक्षयची समोरासमोर भेट होते. सात वर्षांनंतर या दोघांचा आमनासामना होत असल्याने मालिकेतील हा क्षण अतिशय भावनिक ठरला आहे. प्रेक्षकांनाही ही भेट भावूक करणारी वाटली आहे.
लीपनंतर रमा पूर्णपणे बदललेली दिसते. आता ती केवळ भावनांमध्ये अडकलेली नाही, तर एक मजबूत, आत्मविश्वासू आणि आधुनिक स्त्री म्हणून समोर येत आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील हा बदल प्रेक्षकांना आवडला आहे. दुसरीकडे, अक्षय एका जबाबदार वडिलाच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्या मुलीवर त्याचे अपार प्रेम आहे, हेही या प्रोमोमधून स्पष्ट झाले.
‘मुरांबा’ची कथा सुरुवातीपासूनच कुटुंब, नाती आणि त्यांच्या गुंतागुंती भोवती फिरते. आता या नव्या वळणामुळे कथेला अजून रंगत आली आहे. त्यामुळे पुढील काही भागात प्रेक्षकांना अजून नाट्यमय घडामोडींचे पाहायला मिळणार यात शंका नाही. मुरांबा ही मालिका स्टार प्रवाहवर दुपारी १.३० वाजता प्रसारित होते.