Death News: मल्याळम चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर शाजी कुमार यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे मल्याळम मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. 'पुलिमुरुगन', 'नारन' आणि 'थुदारुम' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले होते. त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. विशेष म्हणजे, निधनाच्या वेळी ते अलाप्पुझा येथे एका आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शाजी कुमार हे दिलीप अभिनीत एका आगामी मल्याळम चित्रपटाच्या शूटिंगसाठी अलाप्पुझा येथे गेले होते. यावेळी ते एका हॉटेलमध्ये राहत होते. शनिवारी रात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक उल्लास कृष्णा यांना बरं वाटतं नसल्याचे सांगितले. यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्यांना एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाली होती. मात्र, रविवारी रात्री त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.
शाजी कुमार हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर होते. 'पुलिमुरुगन', 'नारन' आणि 'थुदारुम' यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमधील त्यांच्या कामाचे विशेष कौतुक झाले होते. आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक चित्रपटांना वेगळे दृश्यरूप दिले. त्यांच्या निधनामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीने एक कलाकार गमावला आहे.
शाजी कुमार अनेक वर्षांपासून पेरुंबावूर येथे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी स्मिता आणि आर्यन व सूर्या हे दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी एर्नाकुलम येथील गोकुलम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता पेरुंबावूर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.