व्हायरल व्हिडीओत, इथेनॉल मिश्रीत पेट्रोलमध्ये पाणी असल्याचा दावा करण्यात आलाय. या पेट्रोलमुळे गाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याचंही सांगण्यात येतंय. खरंच इथेनॉल मिश्रीत पेट्रोलमध्ये पाणी आहे का? इथेनॉलच्या वापरामुळे पेट्रोलमध्ये पाण्याचं प्रमाण वाढून इंजिन खराब होतं का? असे सवाल उपस्थित झाले आहेत.
केंद्र सरकारनं पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल टाकण्यास परवानगी दिलीय. त्यामुळे सर्वत्र E20 म्हणजेच इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री केली जातीय. मात्र एका व्हिडीओनं सर्वांचीच चिंता वाढवलीय. या व्हिडीओत एका बाईकचालकानं पेट्रोलपंपावरील पेट्रोलमध्ये पाणी असल्याचं दाखवून दिलंय. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात इथेनॉलमुळे पेट्रोलमध्ये पाण्याचं प्रमाण वाढल्याचा दावा केला जातोय. इथेनॉलमुळे खरंच पेट्रोलची गुणवत्ता घसरतीय का? इथेनॉलच्या वापरामुळे पेट्रोलमध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं गरजेचं आहे. हा विषय पेट्रोल पंप चालकांशी निगडीत असल्यानं याविषयी पेट्रोल पंप चालक अधिक माहिती देऊ शकतात त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी पेट्रोलपंप डिलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि अधिक माहिती जाणून घेतली.
इथेनॉल हे एक प्रकारचे अल्कहोल आहे. कार्बनचं उत्सर्जन कमी करण्यासोबत देशाचं तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉलचा वापर केला जातो. इथेनॉलमध्ये आर्द्रता शोषून घेण्याचा गुणधर्म असतो. त्यामुळे इथेनॉलला पाण्यापासून दूर ठेवणं आवश्यक आहे.
इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनाचं कोणतंही नुकसान होत नाही. केंद्रीय पेट्रोलियमंत्री हरदीपसिंग पुरी यांनीही इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात असल्याचही त्यांनी म्हंटलंय.
त्यामुळे आमच्या पडताळणीत इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये पाणी असल्याचा दावा असत्य ठरलाय. या पेट्रोलमध्ये पाण्याचं प्रमाण असतं तर सरसकट वाहनचालकांनी तक्रार केली असती, व्हायरल व्हिडीओ हैदाराबादचा असून राज्यात असा प्रकार कुठेही घडलेला नाही. मात्र तज्ज्ञांच्या मते इथेनॉलचा पाण्याशी संपर्क आल्यास ते पेट्रोलपासून वेगळं होतं, त्यामुळे पेट्रोलपंपचालक तसच वाहनचालकांनी काळजी घेणंही आवश्यक आहे.