आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची उत्कृष्ट कामगिरी सुरुच आहे. आरसीबी १६ पॉईंट्सह आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. या दरम्यान माजी कर्णधार विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद का सोडले यावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे.२०२१ मध्ये भारतीय संघाचे आणि नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबद्दल विराट कोहलीने चार वर्षांनंतर आपले मौन सोडले आहे. कोहलीने जवळजवळ एक दशक आरसीबीचे आणि देशाचे नेतृत्व केले. २०२१ मध्ये, कोहलीने प्रथम भारतीय टी२० संघाचे आणि नंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरूनही काढून टाकण्यात आले.
आरसीबी पॉडकास्टमध्ये मयंती लँगरशी बोलताना विराट कोहली म्हणाला की, तो त्याच्या कारकिर्दीत अशा टप्प्यावर पोहोचला होता जिथे सातत्याने लक्ष केंद्रित करणे कठीण झाले होते. २०१६ ते २०१९ दरम्यान भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघाच्या नेतृत्वामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही त्याने सांगितले.
विराट कोहलीने कर्णधारपद का सोडले?
आरसीबी बोल्ड डायरीज' पॉडकास्टमध्ये मयंती लँगरशी बोलताना कोहली म्हणाला, 'एक वेळ अशी आली, जेव्हा माझ्यासाठी कर्णधारपद खूप कठीण झाले होते. तेव्हा माझ्या करिअरमध्ये खूप काही घडत होते. मी सात ते आठ वर्षे भारताचे नेतृत्व करत होतो. मी नऊ वर्षे आरसीबीचे नेतृत्व केले. मी जे काही सामने खेळलो, त्यात फलंदाजीबाबत माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तेव्हा मला हे कळाले नाही की कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करण्यास मला अडचण येत आहे. जर मला कर्णधारपदी संघर्ष करावा लागत नव्हता, तर मला फलंदाजीमध्ये संघर्ष करावा लागत होता. मी नेहमी याच गोष्टींचा विचार करायचो. हे माझ्यासाठी खूप कठीण झाले आणि शेवटी याचा माझ्यावरच परिणाम झाला.
आनंदी राहणे महत्त्वाचे आहे
कोहलीने २०२२ मध्ये क्रिकेटमधून एक महिन्याचा ब्रेक घेतला होता. आणि त्या काळात त्याने बॅटला अजिबात हात लावला नाही. कोहली म्हणाला, 'मी कर्णधारपद यासाठी सोडले कारण मला वाटले की जर मला या खेळात टिकून राहायचे असेल तर माझ्यासाठी आनंदी राहणे महत्वाचे आहे. मला माझ्या आयुष्यात असं ठिकाण हवं होतं की जिथे मी कोणत्याही टीकेशिवाय आरामात राहू शकेन. तसेच या हंगामात तुम्ही काय करणार आहात आणि पुढे काय होणार आहे याचा विचार न करता मी माझे क्रिकेट खेळू शकेन. कोहली पुढे म्हणाला की, त्याच्या आयुष्यात असा एक काळ होता जेव्हा तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आनंदी राहण्यासाठी संघर्ष करत होता.