भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव याची पत्नी देविशा शेट्टी सध्या सोशल मीडियावर तिच्या एका पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आहे. दिल्लीतील सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत तिने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टनंतर तिने घेतलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू झालीये.
मंगळवारी देविशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अनेक अकाउंटवरील पोस्ट शेअर केल्या. या पोस्ट सोमवारी झालेल्या Cockroach Janata Party (CJP) च्या 'संसद चलो' आंदोलनाशी संबंधित होत्या. त्यापैकी एका स्टोरीमध्ये तिने आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारावर टीका केली. आंदोलनाच्या नावाखाली कायदा हातात घेणं चुकीचं असल्याचं सांगत तिनं याला थेट 'कायदा मोडणं' असं म्हटलं.
याआधीही देविशाने एक स्टोरी शेअर केली होती. त्यामध्ये तिने, "सरकारवर टीका करा, पंतप्रधानांना प्रश्न विचारा, सरकारी धोरणांविरोधात आंदोलन करा, सत्ताधारी पक्षाविरोधात प्रचार करा आणि मतदानातून त्यांना सत्तेबाहेर करा. हाच लोकशाहीचा खरा मार्ग आहे," असं मत व्यक्त केलं होतं.
'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने देविशाच्या स्टोरीचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले, "सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टी हिच्याबद्दल मनापासून आदर वाटतो. कन्नड भाषिक लोक नेहमीच देशाविरोधी विचारांच्या विरोधात ठामपणे उभे राहतात."
दुसऱ्या एका युजरने लिहिलंय की, "देविशा शेट्टीच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक गोष्ट स्पष्ट होते. या आंदोलनामागचं वास्तव अनेकांना माहिती आहे. म्हणूनच कोणताही मोठा क्रिकेटपटू किंवा प्रसिद्ध सेलिब्रिटी CJP आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत नाही. आंदोलनाच्या नावाखाली हिंदू धर्माची बदनामी केली जातेय."
दरम्यान या आंदोलनाचा भाग म्हणून 20 जुलै रोजी आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हजारो विद्यार्थी आणि तरुण या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा संसदेकडे जात असताना पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसंच आसू धुराच्या नळकांड्याही सोडण्यात आलं.
या कारवाईदरम्यान एका 6 वर्षांच्या मुलालाही याचा फटका बसल्याची घटना समोर आली. या घटनेवरून भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिलीये. तिची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
संजना गणेशनने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. आसू धुराच्या नळकांड्यांच्या वापरामुळे लहान मुलांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचं पाहून खूप वाईट वाटत असल्याचं तिने म्हटलंय. विशेषतः 6 वर्षांच्या मुलाचा उल्लेख करत तिने या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. तिची ही इन्स्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
दरम्यान, मंगळवारी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोक कल्याण मार्ग इथल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या नेत्यांना ताब्यात घेतलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.