भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्व फॉरमॅटच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीतने मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.
कर्णधारपद सोडण्याचा निर्णय तिच्यासाठी सोपा नव्हता, असं हरमनप्रीतने म्हटलं आहे. या प्रवासात अनेक वर्षांच्या आठवणी, भावना आणि त्याग जोडलेले आहेत. तसंच आयुष्यभर सोबत राहतील असे अनेक खास क्षणही या काळात अनुभवायला मिळालेत, असं तिने सांगितलं.
हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने २०२५ चा वनडे वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला होता. हरमनप्रीतने लिहिलंय की, "आज मी भारतीय महिला क्रिकेट टीमच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदावरून पायउतार होतेय. हा निर्णय घेणं सोप्पं नव्हतं. यामध्ये वर्षानुवर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि असे क्षण आहेत. जे माझ्या उर्वरित आयुष्यात कायम माझ्यासोबत राहतील."
"मी या टीमसाठी आणि भारतीय महिला क्रिकेटसाठी माझे सर्वस्व पणाला लावलं. माझ्या रक्ताचं पाणी केलं, घाम गाळला, वेळ दिला आणि अनेकदा माझ्या स्वतःच्या खेळाचा आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षाही बाजूला ठेवल्या. 'टीम नेहमी प्रथम पाहिजे' यावर माझा ठाम विश्वास होता," असे ती पुढे लिहिते.
हरमनप्रीतच्या या निर्णयानंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची माळ स्मृती मानधनाच्या खांद्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे.
ती पुढे म्हणाली, "एक कर्णधार म्हणून मला अनेक कठीण निर्णय घ्यावे लागले. जे अजिबात सोपे नव्हते आणि ज्यांची कधीकधी मला वैयक्तिक किंमत मोजावी लागली. पण मी घेतलेला प्रत्येक निर्णय 'टीम' अधिक मजबूत करण्यासाठीचा होता. इतर खेळाडूंना पुढे जाण्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि स्वतःतील सर्वोत्तम खेळाडू घडवण्याची संधी देणे, हा त्यामागचा उद्देश होता."
"आज मी मनामध्ये अनेक भावना घेऊन, पण शांत आणि समाधानी अंतःकरणाने कर्णधारपद सोडतेय. मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय, असं मला वाटते. माझ्याकडे जे काही होते ते सर्व मी या टीमला दिलं. कर्णधारपद आज सोडत असले, तरी भारतीय क्रिकेटवरील माझे प्रेम कधीही संपणार नाही. आता, मी पुन्हा एकदा फक्त खेळावरील प्रेमासाठी मैदान गाजवायला तयार आहे. हा प्रवास असाच सुरू राहील," असे तिने शेवटी लिहिलंय.
हरमनप्रीतच्या या निर्णयामुळे भारतीय महिला क्रिकेटमधील तिच्या प्रदीर्घ कर्णधारपदाचा एक मोठा टप्पा संपला आहे. आता तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय टीमची धुरा कोणाकडे सोपवली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र कर्णधारपद सोडलं असलं तरी हरमनप्रीत क्रिकेटपासून दूर जाणार नाही. ती खेळाडू म्हणून टीमचा भाग राहणार आहे. त्यामुळे आता तिला तिच्या खेळावर नव्याने लक्ष देण्याची संधी मिळणार आहे.
महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरमनप्रीत कौरने भारताचं 155 सामन्यांत नेतृत्व केलं. या सामन्यांपैकी भारताने 92 सामने जिंकले. 57 सामन्यांत टीमला पराभव स्वीकारावा लागला. एक सामना बरोबरीत सुटला, तर 5 सामन्यांचा निकाल लागला नाही.
टी-20मध्ये हरमनप्रीतचा विजयाचा दर 59.35 टक्के राहिला. तर पराभवाचा दर 36.77 टक्के होता. तर वनडे फॉर्मेटमध्येही तिने दमदार कामगिरी केलीये. वनडे क्रिकेटमध्ये हरमनप्रीतने भारताचं 51 सामन्यांत नेतृत्व केलं. यापैकी 30 सामन्यांत भारताने विजय मिळवला, तर 19 सामन्यांत पराभव झाला. एक सामना बरोबरीत सुटला आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही.
टेस्ट क्रिकेटमध्ये हरमनप्रीतने भारताचं 5 सामन्यांत नेतृत्व केलं. यापैकी भारताने 4 सामने जिंकले, तर एका सामन्यात पराभव झाला. टेस्टमध्ये तिचा विजयाचा दर 80 टक्क्यांवर आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये हा तिचा सर्वात चांगला कर्णधारपदाचा विक्रम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.