टी २० वर्ल्डकपमधील सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद होणाऱ्या अभिषेक शर्माला सुपर ८ मधील सामन्यांत संघात संधी मिळणार नाही अशी चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत आता कर्णधार सूर्यकुमार यादव यानं अभिषेकबाबत महत्वाची प्रतिक्रिया देत जबरदस्त तडका दिला आहे.
अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुपर ८ मधील सामना होणार आहे. त्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं पत्रकार परिषदेत अभिषेक शर्माच्या खराब फॉर्मबाबत भाष्य केलं आहे. अभिषेक शर्माबाबत संघ व्यवस्थापनाला काहीच चिंता वाटत नाही, असं तो म्हणाला.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात २२ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लढत होणार आहे. सुपर ८ फेरीतील या महत्वाच्या सामन्याआधीच कर्णधार सूर्यकुमार यादव यानं संघाची रणनीती, खेळपट्टी, फलंदाजी क्रम आणि संभाव्य प्लेइंग ११ मधील बदलांबाबत मोकळेपणाने माहिती दिली.
अभिषेक शर्मा हा सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झाला. त्याच्या फलंदाजी कौशल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अभिषेकला कदाचित संभाव्य प्लेइंग ११ मधून बाहेर बसावे लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण सूर्यकुमारने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आम्हाला याबाबत अजिबात चिंता वाटत नाही. ज्या लोकांना अभिषेकच्या फॉर्मबाबत चिंता वाटतेय, त्यांच्याबद्दल मला चिंता वाटू लागली आहे, अशी मिश्किल टिप्पणी सूर्यकुमार यादवनं केली.
सूर्यकुमार यादव खंबीरपणे अभिषेकच्या पाठिशी असल्याचे दिसून आले. हा सांघिक खेळ आहे. प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत असा टप्पा येत असतो. मागील वर्षी अभिषेकनं संघाला सावरलं होतं. यावेळी तो धावा करत नसला तरी, आम्ही त्याच्यासाठी धावा करू, असं सूर्यकुमार म्हणाला.
अभिषेक शर्मा यानं मागील तीन सामन्यांत खातंही उघडलं नाही. तसेच आजारी असल्यानं एका सामन्यात तो खेळू शकला नव्हता. सुपर ८ मध्ये टीम इंडियाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये त्याला संधी मिळू शकणार नाही, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, सूर्यकुमार यादवनं त्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे अभिषेक शर्मा सुपर ८ मध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खेळपट्टीबाबतही सूर्यकुमारनं भाष्य केलं आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास संघ सज्ज आहे. तसेच फलंदाजीत आमच्याकडे पुरेसे पर्याय आहेत. कधी-कधी परिस्थितीनुसार खेळावं लागतं. सामन्याला कलाटणी देणारे फलंदाज आमच्याकडे आहेत, असं सूर्या म्हणाला. फिरकीपटूंविरोधात फलंदाजी करणे आव्हानात्मक ठरत असल्याच्या मुद्द्यावरही त्यानं महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही खूप क्रिकेट खेळलोय. अशा गोलंदाजीचा सामना कसा करायचा हे चांगलेच ठाऊक आहे. रणनीतीमध्ये बदल करून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे तो म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.