Virat Kohli should be honored with the Bharat Ratna Award : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला होता. विराट कोहली निवृत्त झाल्याचे सोशल मीडियावर अद्याप प्रतिक्रिया उमटत आहेत. विराट कोहलीला फेरवेल सामना मिळाला नाही. त्यामुळे किंगच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. कोलकात्याविरोधातील सामन्यादरम्यान सर्व चाहते पांढऱ्या जर्सीमध्ये आले होते. विराट कोहलीला सन्मानाने निवृत्ती मिळायला हवी होती, अशी नाराजी सर्वांनी व्यक्त केली. त्यातच किंग कोहलीसाठी चेन्नईच्या माजी खेळाडू बॅटिंग केली. विराट कोहलीला भारतरत्न मिळालायला हवा, अशी मागणी चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैना याने केली आहे. सुरेश रैनाच्या वक्तव्यानंतर विराट कोहली आणि भारतरत्न सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैनाने विराट कोहलीला देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न देण्याची मागणी केली आहे. शनिवार आयपीएलमधील आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान रैनाने ही मागणी केली. चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये खेळलेल्या रैनाने स्टार स्पोर्ट्सच्या एका चर्चेदरम्यान हा मुद्दा उपस्थित केला. कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीच्या घोषणेनंतर रैनाने त्याला सन्मानित करण्यासाठी हा सल्ला दिला आहे.
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहलीने १२ मे रोजी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आयपीएल सुरू असतानाच विराट कोहलीने इन्स्टाग्राम पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. किंग कोहलीला मैदानावर शानदार निरोप मिळेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. परंतु त्याच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. दरम्यान, बेंगलुरू-कोलकाता सामना पावसामुळे सुरू होऊ शकला नाही. यावेळी स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधील योगदानावर चर्चा होत असताना रैनाने भारत रत्नाची मागणी केली.
लाईव्ह टीव्हीवर चर्चेदरम्यान डावखुरा माजी विस्फोटक फलंदाज रैना याने विराट कोहलीसाठी बॅटिंग केली. तो म्हणाला, 'विराट कोहलीने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्याने भारत आणि भारतीय क्रिकेटसाठी जे काही केले, त्यासाठी त्याला भारतरत्नाने सन्मानित केले पाहिजे. भारत सरकारने त्याला हा सर्वोच्च सन्मान द्यावा.'
भारतीय क्रिकेट इतिहासात आतापर्यंत फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला भारत रत्न मिळाला आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने सचिनला भारत रत्न देण्याची शिफारस केली होती आणि तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी हा सन्मान प्रदान केला. विशेष म्हणजे, खेळाडूंना भारत रत्न देण्याचा कोणताही नियम त्यावेळी नव्हता. सचिनसाठीच प्रथम नियमांत बदल करण्यात आले होते. त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला हा सन्मान मिळालेला नाही.
विराट कोहलीला भारतरत्न मिळणार की नाही, हे येत्या काळात स्पष्ट होईल. कोहलीच्या क्रिकेटमधील योगदानाची दखल घेत सरकार ही मागणी कितपत गांभीर्याने घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोहलीच्या चाहत्यांमध्येही या मागणीला पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियावर विराट कोहलीला भारतरत्न देण्यात यावा, या मागणीने जोर धरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.