मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या नुवामा प्रायव्हेट टी-20 मुंबई महिला लीगच्या अंतिम सामन्यात सोबो मुंबई फाल्कन्सने आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्सचा 25 रन्सने पराभव करत इतिहास रचला. स्पर्धेच्या पहिल्याच हंगामात विजेतेपद पटकावत फाल्कन्सने शानदार कामगिरी केली.
प्रथम फलंदाजी करताना फाल्कन्स टीमला सुरुवातीला धक्के बसले. केवळ 22 रन्सवर दोन्ही ओपनर बाद झाल्याने टीम अडचणीत आली होती. मात्र सिमरन शेखने संयमी खेळी करत 35 चेंडूत 50 रन्स केले. तिच्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. तिला सारिका कोळीने 24 रन्स करत चांगली साथ दिली, तर कर्णधार सायली सातघरेनेही 27 रन्सचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. या खेळींच्या जोरावर फाल्कन्सने 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 124 धावा उभारल्या.
आकाश टायगर्सकडून रितिका यादवने प्रभावी गोलंदाजी करत 22 धावांत 3 विकेट्स घेतले. मनाली दक्षिणी आणि हुमैरा काझी यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. 125 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टायगर्सची सुरुवात सावध झाली. कर्णधार हुमैरा काझीने 23 रन्सची खेळी केली. मात्र तिच्या बाद झाल्यानंतर संघावर दबाव वाढू लागला. याच वेळी जान्हवी काटेने अचूक गोलंदाजी करत सामन्याचे चित्र बदलून टाकले.
जान्हवीने प्रथम स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणारी सानिका चाळकेला 18 रन्सवर बाद केलं. त्यानंतर लगेचच फातिमा जाफरलाही माघारी पाठवत तिने टायगर्सला मोठा धक्का दिला. सेजल राऊतने 23 रन्स करत टीमला सावरण्याचा प्रयत्न केला पण जान्हवीने तिचीही विकेट घेत टायगर्सच्या आशांवर पाणी फेरलं.
यानंतर फाल्कन्सच्या गोलंदाजांनी टायगर्सच्या फलंदाजांना मोठी पार्टनरशिप करण्याची संधीच दिली नाही. मधल्या आणि खालच्या फळीतील एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अखेर टायगर्सचा डाव 18.5 ओव्हर्समध्ये 99 रन्सवर संपुष्टात आला आणि फाल्कन्सने 25 धावांनी विजय मिळवला.
फाल्कन्सच्या विजयात जान्हवी काटेने 21 धावांत 3 बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली. अवघ्या 13 वर्षांच्या स्वरा जाधवनेही आपली चमकदार कामगिरी कायम ठेवत 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय सायली सातघरे, निर्मिती राणे आणि अक्षया शिंदे यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
पहिल्या महिला टी-20 मुंबई लीगमध्ये विजेतेपद पटकावत सोबो मुंबई फाल्कन्सने दमदार छाप सोडली, तर युवा खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे या स्पर्धेचे भवितव्य अधिक उज्ज्वल असल्याचे दिसून आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.