भारत आणि न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल रंगणार आहे. भारतानं सेमिफायनलमध्ये दिग्गज ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केलं. तर न्यूझीलंड संघानं दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. तब्बल २५ वर्षांनी दोन्ही संघ आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात फायनलमध्ये भिडणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या फायनलनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दिग्गज क्रिकेटपटू वनडेतून संन्यास घेतील, अशी चर्चा क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे. याबाबत आता माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामुळं क्रिकेट फॅन्स बुचकळ्यात पडले आहेत.
नुकतीच टी २० वर्ल्डकप स्पर्धा झाली. भारतानं जेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर रोहित आणि विराट या दोघांनी टी २० क्रिकेटला रामराम ठोकला. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं. भारताला दुसऱ्यांदा टी २० वर्ल्डकप जिंकून दिल्यानंतर या दोघांनी निवृत्ती जाहीर करून सगळ्यांनाच धक्का दिला होता. आता वनडेतूनही हे दोघे संन्यास घेतील, अशी अटकळ बांधली जात आहे.
माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यानं या दोघांच्या कामगिरीवर आणि वनडेतून निवृत्तीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. ही बाब पूर्णपणे या दोघांवर अवलंबून आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, असे होणे कठीण आहे. २०२५ मध्ये कोहलीची कामगिरी जबरदस्त होत आहे. रोहित शर्माची कामगिरीही बऱ्यापैकी आहे. हो, पण त्याची कामगिरी खूपच चांगली आहे असं मी म्हणणार नाही. कदाचित तो फायनलमध्ये शतक ठोकून परिस्थिती बदलू शकतो, असं आकाश चोप्रा म्हणाला.
रोहित आणि विराट हे दोघे वनडेतून निवृत्त होणार का, असा प्रश्न काही जणांनी विचारला. पण मला याबाबत काही ठाऊक नाही, असं मी सांगितलं. टी २० वर्ल्डकपनंतर त्या दोघांनी निवृत्ती जाहीर करणे सगळ्यांनाच अपेक्षित होते. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं असं काहीच नव्हतं. पण ते दोघे टी २० आणि वनडे दोन्ही प्रकारांतून संन्यास घेणार असतील तर ते केवळ कसोटी क्रिकेटमध्येच खेळताना दिसतील. पण ते दोघे हा मार्ग अवलंबतील का? कुणास ठाऊक? असं प्रश्नार्थक उत्तर आकाश चोप्रानं दिलं. वनडे वर्ल्डकपला अद्याप दोन वर्षे आहेत आणि दोन वर्षे हा खूप मोठा कालावधी आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर आगामी १२ महिन्यांत अनेक वनडे सामने खेळायचे आहेत. ते या सामन्यांसाठी उपलब्ध असतील, असेही आकाश चोप्रा म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.