PAK vs ZIM T20 World Cup : टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत पाकिस्तानची सुरूवात अत्यंत खराब झाली. पहिल्या सामन्यांत भारताकडून झालेल्या पराभवानंतर दुसऱ्या सामन्यांतही झिम्बाब्वेने पाकिस्तानचा (Pakistan) पराभव केला. या पराभवामुळे पाकिस्तानचे केवळ चाहतेच नाही तर, खेळाडूही नाराज झालेत. सध्या पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो ढसाढसा रडताना दिसत आहे. (Cricket News)
शादाब खानचा हा व्हिडिओ पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूमबाहेरचा आहे. या व्हिडिओमध्ये तो गुडघ्यावर बसून डोके खाली ठेवून रडत आहे. यादरम्यान पाकिस्तानी संघाचा एक सदस्यही त्याच्या बाजूला उभा असून त्याचे सांत्वन करताना दिसत आहे.
शादाबचा रडणारा व्हिडिओ पाहून अनेक पाकिस्तानी चाहतेही भावूक झाले. मात्र, काही लोकांनी याबाबत शादाबला ट्विटरवर ट्रोल करत त्याच्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानची सुरूवात खूपच खराब झाली. आधी भारताच्या विरुद्ध तर आता तुलनेने दुबळ्या मानल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेच्या समोरसुद्धा पाकिस्तानी खेळाडूंनी गुडघे टेकले.
झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर विजयासाठी १३१ धावांचे आव्हान ठेवले होते. कर्णधार बाबर आझम आणि यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान लवकर बाद झाल्यानंतर पाकिस्तानची मधली फळी पुन्हा फ्लॉप झाली. शान मसूदने काही धावा केल्या. पण तो विजयापर्यत संघाला पोहोचवू शकला नाही.
चौथ्या विकेटसाठी 52 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. ज्यामुळे पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. पण कमी ओव्हरमुळे झिम्बाब्वेला फायदा झाला आणि त्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेला. शेवटी त्यांनी विजय मिळवला.
बाबर आझमही निराश दिसला
पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझमही खूप दुःखी झाला होता. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये बाबर मॅच हरल्यानंतर दोन्ही हातांनी तोंड दाबून धरलेला दिसत होता. असंच काहीसं मोहम्मद नवाजसोबत घडलं. सामन्याच्या शेवटच्या षटकात नवाज आऊट होताच थोडावेळ डोके खाली करून खेळपट्टीवर बसला. दरम्यान, आता शादाब खान सुद्धा ड्रेसिंग रुमच्या बाहेर रडतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.