घड्याळाचा काटा पुढे सरकत होता... इंग्लंडचे चाहते विजयाचा जल्लोष करण्याच्या तयारीत होते... दुसरीकडे अर्जेंटिनाच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. पण मैदानावर लिओनेल मेस्सी नावाचं वादळ अजून यायचं बाकी होतं. अवघ्या सात मिनिटांत मेस्सीने अशी काही जादूची कांडी फिरवली आणि त्याने सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. मेस्सीने अर्जेंटिनाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचवलं.
फीफा वर्ल्डकप 2026 च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्येही असाच एक थरार पाहायला मिळाला. अखेरच्या काही मिनिटांपर्यंत विजयाच्या उंबरठ्यावर उभी असलेली इंग्लंडची टीम लिओनेल मेस्सीच्या जादुई खेळीसमोर कोसळली. अवघ्या सात मिनिटांत अर्जेंटिनाने सामन्याचं चित्र पालटलं आणि इंग्लंडचा 2-1 असा पराभव करत सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
आता रविवारी न्यू जर्सीमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाची गाठ स्पेनशी होणार आहे. सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्यापासून मेस्सी आणि त्याची टीम आता फक्त एका विजयाच्या अंतरावर आहे.
अटलांटामधील मर्सिडीज-बेंझ स्टेडियममध्ये सामना सुरू होताच दोन्ही टीमच्या चाहत्यांचा प्रचंड जल्लोष आणि मैदानावरील तणाव स्पष्ट जाणवत होता. पहिल्या हाफमध्ये दोन्ही टीम्सने आक्रमक खेळ केला.
सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडेजने केलेल्या फाऊलनंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक वाद झाला. इंग्लंडने संपूर्ण सामनाभर मेस्सीवर नजर ठेवली आणि त्याला मोकळेपणाने खेळण्याची फारशी संधी दिली नाही. अर्जेंटिनाच्या मार्टिनेज आणि इंग्लंडच्या इलियट अँडरसन यांना यलो कार्डही दाखवण्यात आले. दोन्ही टीम्सना काही संधी मिळाल्या मात्र फर्स्ट हाफमध्ये एकही गोल झाला नाही.
दुसऱ्या हाफमध्ये मात्र सामन्याचं स्वरूप बदललं. 55व्या मिनिटाला इंग्लंडच्या मॉर्गन रॉजर्सने अप्रतिम पास दिला आणि अँथनी गॉर्डनने अचूक फिनिशिंग करत गोल मारला. या गोलमुळे इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर अर्जेंटिनावर दबाव वाढला आणि वेळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसा इंग्लंडचा विजय जवळपास निश्चित मानला जाऊ लागला.
अर्जेंटिनाच्या चाहत्यांच्या आशा मावळत असतानाच लिओनेल मेसीने पुन्हा एकदा आपल्या अनुभवाची आणि कौशल्याची झलक दाखवली. 85व्या मिनिटाला त्याने इंग्लंडच्या डिफेंडर्सना चकवत एन्झो फर्नांडेजकडे अचूक पास दिला. फर्नांडेजने पेनल्टी बॉक्सच्या बाहेरून चेंडू थेट गोलपोस्टमध्ये पाठवला आणि सामना 1-1 असा बरोबरीत आणला.
सामना अतिरिक्त वेळेत जाणार असं वाटत असतानाच इंज्युरी टाइममध्ये मेस्सीने पुन्हा एकदा अचूक पास दिला. त्या पासवर लाउतारो मार्टिनेजने कोणतीही चूक न करता गोल केला. अवघ्या सात मिनिटांत अर्जेंटिनाने 0-1 अशा पिछाडीवरून 2-1 अशी आघाडी घेत सामना आपल्या नावावर केला.
अंतिम शिट्टी वाजताच अटलांटाच्या मैदानावर भावनिक क्षण पाहायला मिळाला. विजय निश्चित होताच 39 वर्षीय लिओनेल मेस्सी मैदानावर गुडघ्यावर बसला आणि त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यानंतर त्याने टीममधील सहकाऱ्यांना मिठी मारत हा विजय साजरा केला. इंग्लंडचा वर्ल्डकप जिंकण्याचा प्रवास उपांत्य फेरीतच थांबला. तर अर्जेंटिना आता सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्यापासून फक्त एका पाऊल दूर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.