अखेर आयपीएलच्या २०२६ ची ट्रॉफी सलग दुसऱ्या वर्षी आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने उचलली. गुजरात टायटन्सचा पराभव करत आरसीबीने दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. मात्र या सिझनमध्ये केवळ एका १५ वर्षीय मुलाच्या नावाची चर्चा होती. हा खेळाडू म्हणजे वैभव सूर्यवंशी.
यंदाच्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सला अंतिम फेरी गाठता आली नाही. परंतु किशोरवयीन खेळाडू वैभव सूर्यवंशीने आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर संपूर्ण स्पर्धेत वेगळी छाप सोडली. दरम्यान फायनल सामन्यात झालेल्या अवॉर्ड सेरेमनीमध्ये वैभवच चर्चेत राहिला.
राजस्थान रॉयल्सचा प्रवास क्वालिफायर-2 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या पराभवाने संपुष्टात आला. मात्र टीमच्या अखेरच्या सामन्यातही वैभव सूर्यवंशीने दमदार खेळी करत केवळ 47 चेंडूत 96 रन्स केले होते.
अवघ्या 15 वर्षांच्या वैभवने आयपीएल 2026 मध्ये 16 डावांत 48.50 च्या सरासरीने आणि तब्बल 237.30 च्या स्ट्राइक रेटने 776 रन्स केलेत. या काळात त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतकं झळकावलीयेत. 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यानंतर अवॉर्ड सेरेमनी पार पडला. या सोहळ्यात वैभव सूर्यवंशीने अनेक पुरस्कारांवर त्याचं नाव कोरलं आहे. हे पुरस्कार कोणते आहेत ते पाहूयात.
संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक आक्रमक फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचा हा पुरस्कार वैभव सूर्यवंशीला मिळाला. या पुरस्कारासाठी किमान 7 सामने खेळलेले आणि 100 चेंडूंचा सामना केलेले फलंदाज पात्र होते. वैभवने 237.30 च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने रन्स करत हा मान पटकावला. या पुरस्कारासोबत वैभवला टाटा सिएरा कार देखील भेट देण्यात आली.
आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने तब्बल 72 षटकार ठोकलेत. आयपीएलच्या एका सिझनमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्डही त्याने आपल्या नावावर केला. सर्वाधिक षटकारांसाठी त्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस मिळालंय. या यादीत सनरायझर्स हैदराबादचा अभिषेक शर्मा 43 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर राहिला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने 41 सिक्सेस लगावलेत.
वैभव सूर्यवंशीला 'इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन' हा पुरस्कारही देण्यात आला. यामध्ये त्याला 10 लाखांचं बक्षिसही देण्यात आलंय. या पुरस्कारासाठी 1 एप्रिल 2000 नंतर जन्मलेले, 25 पेक्षा कमी आयपीएल सामने खेळलेले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले खेळाडू पात्र होते. प्रियांश आर्य आणि प्रिन्स यादव यांच्यासारखे युवा खेळाडू या शर्यतीत होते. मात्र वैभवने सर्वांना मागे टाकत हा सन्मान पटकावला.
आयपीएल 2026 मधील सर्वात मोठ्या वैयक्तिक पुरस्कारावरही वैभव सूर्यवंशीने आपले नाव कोरलंय. त्याला 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन' म्हणून गौरवण्यात आलंय. संपूर्ण सिझनमध्ये त्याने 436.5 पॉईंट्स मिळवलेत. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा दुसऱ्या स्थानावर राहिला. या पुरस्कारासाठी वैभवला 15 लाख रुपयांची रक्कम देण्यात आली. गेल्या सिधनमध्ये हा पुरस्कार मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवने जिंकला होता.
सर्वाधिक रन्स करणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी ऑरेंज कॅपही वैभव सूर्यवंशीनेच पटकावलीये. त्याने या सिझनमध्ये 776 रन्स करत हा मान पटकावलाय. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल 732 रन्ससह दुसऱ्या तर साई सुदर्शन 722 रन्ससह तिसऱ्या स्थानावर होता. ऑरेंज कॅपसोबतच सर्वाधिक रन्स केल्याबद्दल वैभवला 10 लाख रुपयांचं बक्षीसही देण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.