जे मुंबई, पुणे, नागपूर, पर्थ, सिडनी आणि मेलबर्नमध्ये नव्हतं घडलं, ते कटकमध्ये घडलंय. गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेली रोहितची बॅट अखेर इंग्लंडविरुद्ध गरजली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना कटकच्या बाराबाती स्टेडियममध्ये पार पडला.
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर विजयासाठी ३०५ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि हा सामना ४ गडी राखून जिंकला. यासह या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.
भारताला हा सामना जिंकण्यासाठी ५० षटकात ३०५ धावा करायच्या होत्या. भारताचा पॉवरपॅक फलंदाजीक्रम पाहता हे आव्हान तसं फार मोठं नव्हतं. सर्वात मोठा प्रश्न हाच होता की, रोहित फॉर्ममध्ये परतणार का? अखेर रोहितला सूर गवसला. रोहितने पहिल्या चेंडूपासून इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला आणि ३० चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
त्यानंतर ७६ चेंडूंमध्ये आपल्या वनडे कारकिर्दीतील शतकही पूर्ण केलं. रोहितने या डावात ९० चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या साहाय्याने ११९ धावांची खेळी केली. तर त्याला शुभमन गिलची चांगली साथ मिळाली. गिलने ५२ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि १ षटकारांच्या साहाय्याने ६० धावांची खेळी केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १३६ धावा जोडल्या.
शुभमन गिल ६० धावांवर बाद झाल्यानंतर विराट कोहलीवर मोठी जबाबदारी होती. मात्र विराट अवघ्या ५ धावा करत तंबूत परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि रोहित शर्माची जोडी जमली. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली आणि भारतीय संघाला विजयाच्या आणखी जवळ पोहोचवलं. श्रेयस अय्यर ४४ धावांवर धावबाद होऊन माघारी परतला. शेवटी अक्षर पटेलने भारतीय संघाचा डाव सांभाळला आणि भारताला विजय मिळवून दिला.
दोन्ही संघांमधील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने ४ गडी राखून विजय मिळवून दिला होता. यासह भारताने १-० ने आघाडी घेतली होती. आता दुसरा सामना जिंकून भारताने वनडे मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.