
भारताचा कर्णधार रोहित शर्माला अखेर सुर गवसला आहे. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका, ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर- गावसकर मालिका आणि त्यानंतर रणजी ट्रॉफीतही रोहितची बॅट शांत राहिली होती.
मात्र भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहितने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत वादळी शतक पूर्ण केलं. रोहितने ७६ चेंडूंचा सामना करत आपल्या वनडे कारकिर्दीतील ३२ वे शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे.
कटकच्या बाराबाती स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ३०४ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करत असताना भारतीय संघाला दमदार सुरुवातीची गरज होती. सलामीला फलंदाजी करताना रोहित आणि शुभमन गिलने दीडशतकी भागीदारी केली.
यादरम्यान रोहितने सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये भारताचा दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला मागे सोडलं आहे. राहुल द्रविडच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये ३४४ सामन्यांत १२ शतक आणि ७३ अर्धशतकांसह १०८८९ धावा करण्याची नोंद आहे.
रोहितने आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करताच राहुल द्रविडचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. रोहितने १०९०० धावांचा पल्ला गाठला आहे. यासह तो ११,००० वनडे धावा करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि सौरव गांगुली हे रोहितपेक्षा पुढे आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावे १८४२६ धावा करण्याची नोंद आहे. तर विराट कोहलीच्या नावे १३९०६ धावा करण्याची नोंद आहे. तर सौरव गांगुलीच्या नावे ११३६३ धावा करण्याचा रेकॉर्ड आहे.
भारतीय संघासाठी वनडेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१८४२६ धावा - सचिन तेंडुलकर (४६३ सामने)
१३९०६ धावा* - विराट कोहली (२९६ सामने)
११३६३ धावा - सौरव गांगुली (३११ सामने)
१०९०० धावा* - रोहित शर्मा (२६७ सामने)
१०८८९ धावा - राहुल द्रविड (३४४ सामने)
१०७७३ धावा - एमएस धोनी (३५० सामने)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.