आशियाई चॅम्पियन्स चषक पुरुष हॉकी स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघानं तगड्या जपानवर एकतर्फी विजय मिळवला. सुखजीत सिंह या विजयाचा हिरो ठरला. त्यानं सामना सुरू होताच, दुसऱ्या मिनिटाला पहिला गोल डागला. तर ६० व्या मिनिटाला त्यानं वैयक्तिक दुसरा गोल डागत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
जपानला ५-१ ने पराभूत केलं. अभिषेकने तिसरा, संजयने १७ व्या मिनिटाला आणि उत्तम सिंह याने ५४ व्या मिनिटाला गोल डागत चांगली साथ दिली. त्यांच्या जबरदस्त कामगिरीनं संपूर्ण सामन्यावर भारतीय संघाचं वर्चस्व बघायला मिळालं.
जपान संघाच्या मात्सुमोतो काजुमासा यानं ४१ व्या मिनिटाला एकमेव गोल डागला. पण यजमान संघाला तगडी टक्कर देण्यासाठी ही कामगिरी पुरेशी नसल्याचे दिसून आले. चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या भारतीय संघाने याआधीच्या सामन्यात चीनला ३-० ने पराभूत केलं होतं. हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वात भारतीय संघ बुधवारी मागील मोसमातील उपविजेत्या मलेशियासोबत भिडणार आहे.
सहा संघांमधील राउंड-रॉबिड लीगनंतर अव्वल ४ संघ १६ सप्टेंबरला होणाऱ्या सेमिफायनलसाठी पात्र ठरतील. तर फायनल दुसऱ्या दिवशीच म्हणजे १७ सप्टेंबरला होईल.
भारतानं सामन्याच्या सुरुवातीच्या दुसऱ्या मिनिटालाच सुखजीतने डागलेल्या गोलच्या जोरावर आघाडी घेतली. पुढच्याच मिनिटाला भारतानं दुसरा गोल डागत २-० अशी आघाडी घेतली. अभिषेकनं केलेला हा गोल सगळ्यांनाच चकित करणारा होता. त्यानं डिफेंडर आणि गोलकीपरला चकवा देत पोस्टमध्ये गोल डागला. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारताचा आक्रमक खेळ सुरूच होता. संजयने १७ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचं रुपांतर गोलमध्ये केलं. अर्ध्या डावापर्यंत भारत ३-० ने मजबूत स्थितीत होता. जपाननं अखेरपर्यंत प्रयत्न केले, पण सुरुवातीलाच मिळालेल्या हादऱ्यांमधून सावरता आलं नाही.
दुसऱ्या डावापासून भारतानं आक्रमक खेळी करणं पसंत केलं. पण ४१ व्या मिनिटाला जपाननं वापसी करण्याचा प्रयत्न केला. काजुमासा यानं गोल डागला आणि गुणसंख्येत एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न केला. अखेर भारतानं यातून धडा घेत चौथा गोलही डागला. तर सुखजीतनं पाचवा आणि विजयी गोल डागला आणि सामन्याचा शेवट गोड केला. आम्ही सुरुवातीपासूनच चांगला आक्रमक खेळ केला आणि आपल्या लक्ष्यावर ठाम राहिलो, असं मॅचविनर अभिषेक यानं सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.