श्रीलंकेच्या मैदानावर भारतीय खेळाडूंची कसोटी लागते, असं म्हटलं जातं. पण या कसोटीला भारतीय संघाचे धुरंधर खरे उतरले. पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांनी कसोटीवर जबरदस्त पकड मिळवली आहे. भारतीय फलंदाज म्हणजे देवदत्त पडीक्कल आणि केएल राहुल यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी केली. पण त्याचदरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी घटना मैदानात घडली. फॉर्मात असलेला राहुल अचानक मैदान सोडून बाहेर गेला. त्याचा हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केएल राहुल सुरुवातीपासूनच फॉर्मात दिसला. शतकी खेळीकडं वाटचाल करत असतानाच, वैयक्तिक ७७ धावांवर तो मैदान सोडून बाहेर गेला. राहुल आणि पडिक्कल या जोडीनं श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पण थकवा आणि क्रॅम्प्समुळं राहुलला खेळणं अशक्य झालं. त्याला रिटायर्ड हर्ट म्हणून घोषित करण्यात आलं.
केएल राहुल मैदानात विव्हळत असताना, श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डीसिल्व्हा यानं त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हात स्ट्रेच करून बघितलं, पण राहुलला प्रचंड वेदना होत असल्याचं दिसलं. शेवटी त्याला मैदान सोडून बाहेर जावं लागलं. त्याचा फोटो आता व्हायरल होत आहे. तो फोटो बघून भारतीय क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली आहे. तो दुखापतीतून सावरून पुन्हा मैदानात यावा आणि शतकी खेळी साकारावी, अशा प्रतिक्रिया आता चाहत्यांकडून येत आहेत.
तत्पूर्वी पावसाच्या व्यत्ययानंतर पहिल्या दिवसाचा खेळ पुन्हा सुरू झाला. त्यावेळी राहुल आणि पडिक्कल या दोघांनी संयमी फलंदाजी करून डाव पुढे नेला. दोघांनीही त्यांची अर्धशतके पूर्ण केली. श्रीलंकेच्या गोलंदाजांवर त्यांनी अखेरपर्यंत दबाव ठेवला. राहुलने १६२ चेंडूंचा सामना करून ७७ धावांची दमदार खेळी केली.
दुसऱ्या बाजूने पडिक्कलने आक्रमक खेळी केली. त्यानं ऐतिहासिक शतक ठोकलं. हे त्याचं कसोटीतलं पहिलं शतक ठरलं. स्वातंत्र्यदिनी शतकी खेळी साकारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. केएल राहुल मैदानाबाहेर गेल्यानंतरही त्याच्या बॅटमधून धावा निघतच होत्या. पडिक्कलने १३४ चेंडूंचा सामना करताना आपलं पहिलं कसोटी शतक साकारलं.
तत्पूर्वी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यानं वेगवान सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४७ धावा केल्या. यशस्वी जयस्वाल मोठी खेळी साकारेल असे वाटत होते. तो लयीत दिसून आला. पण धाव घेताना तो गोलंदाजाला धडकला. त्यानंतर क्रीजवर पोहोचताना संभ्रमात पडला आणि दोन्हीही फलंदाज एकाच दिशेला पोहोचले. राहुल आधीच क्रीजमध्ये पोहोचला. त्यामुळं जयस्वालला बाद ठरवण्यात आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.