नवी दिल्ली : नुकतीच भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघात टी-20 मालिका झाली. या मालिकेत भारतीय संघाने इंग्लंडला धूळ चारत 2-1 ने विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये शतक झळकावले. त्याने 55 चेंडूत 117 धावा चोपल्या. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला बक्षीसही मिळालं. ICC T20 च्या क्रमवारीत सुर्यकुमारने तब्बल 44 स्थानांची झेप घेत टॉप 10 फलंदाजाच्या यादीत स्थान मिळवलं. (Latest ICC T20i Rankings)
सूर्यकुमार यादवचे एकूण 732 रँकिंग गुण आहेत. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. तो पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला टॉप-10 मध्ये स्थान मिळवता आलेले नाही. यासोबतच वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 7 स्थानांनी प्रगती करत 7 व्या क्रमांकावर झेप घेतली. टॉप-10 मध्ये तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे.
फलंदाजांमध्ये इतर भारतीयांबद्दल बोलायचे झाले तर युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन 12 व्या क्रमांकावर आहे. याशिवाय रोहित शर्मा 18 व्या, केएल राहुल 19 व्या, श्रेयस अय्यर 21 व्या आणि विराट कोहली 25 व्या स्थानावर पोहोचला आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 818 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान दुसऱ्या, दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम तिसऱ्या आणि इंग्लंडचा डेव्हिड मलान चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच सहाव्या क्रमांकावर, डेव्हन कॉनवे सातव्या क्रमांकावर, निकोलस पूरन आठव्या क्रमांकावर, पथुम निसांका नवव्या क्रमांकावर आणि रासी वान दुर दुसेन दहाव्या क्रमांकावर आहे. (ICC T20i Latest Rankings)
भुवनेश्वर कुमारने इंग्लंडविरुद्धच्या T20 मध्ये शानदार कामगिरी केली होती. ते 658 गुणांसह संयुक्तपणे 7 व्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर हर्षल पटेलने 10 स्थानांची प्रगती करत 23 व्या स्थानावर पोहोचला आहे. लेगस्पिनर युजवेंद्र चहल 19 व्या तर जसप्रीत बुमराह 28 व्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोस हेजलवूड 792 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा आदिल रशीद दुसऱ्या, दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी तिसऱ्या, अफगाणिस्तानचा राशीद खान चौथ्या आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम झंम्पा पाचव्या स्थानावर आहे.
बुमराह वनडे मध्ये अव्वल
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराहने आपल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर अर्धा संघ गारद केला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने आयसीसीच्या एकदिवसीय क्रमावारीत अव्वल स्थानी झेप घेतली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बुमराहने 19 धावा देऊन 6 बळी घेतले. हा सामना भारताने 10 गडी राखून जिंकला होता.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.