मुंबई इंडियन्ससाठी IPL 2026 चा सिझन फारच वाईट होता. मुंबईला १४ सामन्यांपैकी फक्त ४ सामने जिंकता आले. दरम्यान या खराब कामगिरीनंतर टीममध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून पुढील सिझनआधी मुंबई इंडियन्स त्याला कर्णधारपदावरून हटवू शकते, अशी चर्चा रंगलीये.
या सिझनची सुरुवात मुंबई इंडियन्सने विजयाने केली होती. अनेक वर्षांनंतर टीमने स्पर्धेतील पहिलाच सामना जिंकला होता. मात्र त्यानंतर टीमची घरगुंडी सुरुच झाली. विशेषतः वानखेडे स्टेडियमवर सलग चार पराभव स्वीकारावे लागले. या पराभवांमुळे टीमच्या नावावर काही नकोसे विक्रमही नोंदवले गेले.
टीममधील अनेक मोठे खेळाडू अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. रोहित शर्मा फिटनेसच्या समस्येमुळे सर्व सामने खेळू शकला नाही. सूर्यकुमार यादवचा फॉर्म पूर्णपणे गायब झालेला दिसला. तर जसप्रीत बुमराहसारख्या अनुभवी गोलंदाजासाठी हा सिझन कारकिर्दीतील सर्वात खराब सिझनपैकी एक ठरला.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अखेरच्या लीग सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफने सर्व खेळाडूंसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत काही वरिष्ठ खेळाडूंच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तसंच कोचिंग स्टाफने सामन्यांदरम्यान डेटाच्या आधारे काही सूचना दिल्या होत्या, पण खेळाडूंनी त्या मैदानावर योग्य पद्धतीने अंमलात आणल्या नाहीत, अशीही नाराजी व्यक्त करण्यात आलीये.
मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोन टी-20 वर्ल्डकप विजेत्या कर्णधारांचा अनुभव आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाज आणि हार्दिक पांड्यासारखा स्टार ऑलराउंडर टीममध्ये असूनही टीमला चांगली कामगिरी करता आली नाही.
रिपोर्टनुसार, भविष्यात वरिष्ठ खेळाडूंनीदेखील प्रशिक्षकांच्या सूचनांचं पालन करणं आवश्यक असल्याचं कोचिंग स्टाफने स्पष्ट केलंय. त्यामुळे पुढील सिझनपूर्वी टीम मॅनेजमेंट काही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय.
जर हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं तर तो मुंबई इंडियन्समध्ये कायम राहणार का, याबाबतही चर्चा सुरू झालीये. पुढील हंगामात काही फ्रँचायझी त्यांच्या कर्णधारांमध्ये बदल करू शकतात. यामध्ये लखनऊ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या टीम्सची नावं चर्चेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.